दूधविक्री थंडावल्याने खव्यासाठी भट्टी गरम 

तीर्थपुरी : बाणेगाव येथील सिद्धेश्वर जंगले व पत्नी संचिता जंगले दुधापासून खवा बनविताना. 
तीर्थपुरी : बाणेगाव येथील सिद्धेश्वर जंगले व पत्नी संचिता जंगले दुधापासून खवा बनविताना. 

तीर्थपुरी (जि.जालना) - कोरोना विषाणूमुळे गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन असल्यामुळे सर्वच व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या भागातील दुग्धव्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. दूधविक्री थंडावल्याने खवा बनविण्यासाठी आता ग्रामीण भागात भट्टी गरम होत आहे. बाणेगाव येथील प्रयोगशील शेतकरी व पशुपालक सिद्धेश्वर जगले यांनीही लॉकडाउनच्या काळात दुधापासून खवा बनविण्यासह घरपोच विक्री सुरू केली आहे. 

लॉकडाउनमुळे शेतीसह सर्व व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शेतात पिकविलेला भाजीपाला तसेच इतर फळे शेतकरी घरोघरी जाऊन विक्री करीत आहेत.

या भागात दुग्धव्यवसाय करणारे मोठ्या प्रमाणात असून, दुधाची विक्री कशी करावी, असा प्रश्न या व्यावसायिकांना पडला. त्यामुळे आता खवा बनविण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे.

श्री. जंगले यांनी गेल्या महिनाभरापासून पत्नी संचिता यांच्यासह कुटुंबीयांच्या मदतीने दुधापासून खवा बनवून विक्री करीत आहेत. श्री. जंगले यांच्याकडील दुभती जनावरे दररोज जवळपास ५० लिटर दूध देतात. दुधाची विक्री सध्या कमी झाल्याने त्यांनी घरी खवा बनविणे सुरू केले आहे. दररोज आठ किलोंपर्यंत खवा तयार होत आहे. 

विक्रीसाठी सोशल मीडियाचा आधार 

दुधापासून तयार झालेला खवा विक्री कसा करावा, असा प्रश्न सिद्धेश्वर यांना पडला होता; परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून खवा विक्रीचा मार्ग त्यांनी शोधला. त्यामुळे ठिकठिकाणांहून या खव्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. सोशल मीडियाचा मोठा आधार मिळाला. परिणामी दररोज तयार झालेला खवा विकला जात आहे. बाजारात प्रतिकिलो २४० ते २५० रुपये याप्रमाणे खवा मिळत आहे; परंतु सिद्धेश्वर यांनी बाजारापेक्षा कमी दर ठेवला आहे. 

गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन असल्याने दूधविक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे घरी खवा बनवून घरपोच विक्रीचा निर्णय घेतला. दररोज खव्याला मागणी वाढत असून, ग्राहकांकडून पनीरची मागणी होत आहे, त्यामुळे पनीर बनविणे सुरू करणार आहे. 
- सिद्धेश्वर जंगले, बाणेगाव. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com