आंबा महोत्सवातून लाखो रुपयांची उलाढाल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

पणन महामंडळ आणि बाजार समितीतर्फे पाचदिवसीय घेण्यात आलेल्या आंबा महोत्सवातून कोकणातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

औरंगाबाद - पणन महामंडळ आणि बाजार समितीतर्फे पाचदिवसीय घेण्यात आलेल्या आंबा महोत्सवातून कोकणातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या महोत्सवातून अवघ्या चार दिवसांत 10 हजार डझन आंब्यांची विक्री झाली असून, यातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची उलाढाल केली आहे. पुढील वर्षी महोत्सवात आवर्जून येणार असून आंबा जास्त आणणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

बाजार समितीत फुल मार्केटमध्ये 13 ते 17 मेदरम्यान हा महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात 21 हापूस आणि केसर उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा शहरवासीयांना उपलब्ध व्हावा आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी हा महोत्सव घेण्यात आला. पाच दिवसांच्या महोत्सवात 10 हजार डझन आंब्यांची विक्री झाली. गेल्या वर्षी पाच ते सात हापूस विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता. यंदा 18 ते 19 हापूस विक्रेत्यांनी सहभाग घेत दर्जेदार हापूस शहरवासीयांना उपलब्ध करून दिला. हापूससाठी पहिल्या दिवसापासून खरेदीसाठी शहरवासीयांनी गर्दी केली होती. महोत्सवासाठी पणन आणि बाजार समितीने व्यवस्था चांगली केल्यामुळे आंबा महोत्सव यशस्वी ठरला. बाजार समितीचे नियोजन आणि पणनची लाभलेली साथ यामुळे आम्ही आंबा विक्री करू शकल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर महोत्सव संपल्यानंतर आम्हाला अनेकांचे आंब्यासाठी फोन आल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. 

हापूस 100 रुपयांनी स्वस्त 
औरंगाबादेत हापूस पाच ते सात ठिकाणी विक्री करण्यात येत आहे. मात्र 400 रुपये डझनपासून पुढे हा हापूस विक्री होतो. त्यातही तो अस्सल असेल याची खात्री नव्हती. पणन आणि बाजार समितीच्या विश्‍वासाने भरविण्यात आलेल्या आंबा महोत्सवात अडीचशे ते तीनशे रुपये डझन आंबा विक्री झाला. यामुळे मार्केटपेक्षा शंभर ते दीडशे रुपये स्वस्त हापूस ग्राहकांना मिळाला आहे. यामुळे खरेदीदारांनी विश्‍वासाने पाच ते सहा डझनची खरेदी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of turnover of Mango Festival in maharashtra