‘एमआयएम-वंचित’ने बदलली समीकरणे

शेखलाल शेख
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे एकमेव उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाल्याने जिल्ह्यात ‘एमआयएम-वंचित’ फॅक्‍टरने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

निवडणूक वार्तापत्र  - औरंगाबाद जिल्हा
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे एकमेव उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाल्याने जिल्ह्यात ‘एमआयएम-वंचित’ फॅक्‍टरने राजकीय समीकरणे बदलली आहेत. शहरातील मतदारसंघांसोबत ग्रामीण भागात फारसे संघटन नसताना एमआयएमने लक्षणीय मते मिळविल्याने शिवसेना-भाजप सावध, तर काँग्रेस-राष्ट्रवादी दुबळी झाली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटल्याने जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी भाजप-शिवसेनेने प्रत्येकी तीन, तर एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम वंचित बहुजन आघाडीला भरघोस मते मिळाल्याने युती-आघाडीसमोर मोठे आव्हान असेल. २००९ च्या निवडणुकीत युती आणि आघाडीची स्थिती बघितली, तर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला सहा, तर राष्ट्रवादीकडे तीन मतदारसंघ आहेत. युतीत भाजपकडे तीन तर शिवसेनेकडे सहा विधानसभा मतदारसंघ होते.

शहरातील पाणी, रस्ते, कचरा समस्यांमुळे लोकांमध्ये असलेली नाराजी आणि मराठा फॅक्‍टरचा फटका युतीच्या उमेदवाराला बसला. हे प्रश्‍न आजही कायम असले तरी ‘वंचित’मुळे युती-आघाडीची शहरात दमछाक झाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत झाले, तरी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत. युतीत विद्यमान आमदार वगळता इतर ठिकाणी कोण, याची फक्त चर्चाच आहे. एमआयएम-वंचित आघाडीकडे उमेदवारीसाठी उड्या पडत आहेत.

२०१४ मध्ये युती-आघाडीत बिघाडी झाल्यानंतर एमआयएमची शहरात एन्ट्री झाली. औरंगाबाद मध्यमधून इम्तियाज जलील विजयी झाले. आता ते खासदार झाल्याने त्यांच्या जागेसाठी एमआयएममध्ये रस्सीखेच आहे. डझनाहून अधिक इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केलेत. युतीत शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघातून प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडून प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, कय्युम शेख यांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्यात.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपकडून राज्यमंत्री अतुल सावे यांनी मागील निवडणुकीत चार हजार २६० मतांनी निसटता विजय मिळविला होता. युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला असल्याने, सावेच पुन्हा मैदानात राहतील. एमआयएमकडून मागील वेळेस काट्याची टक्कर देणारे डॉ. गफ्फार कादरी यांचे नाव पुन्हा चर्चेत असले तरी त्यांना पक्षातूनच मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्याने येथे इब्राहिम पठाण, अहेमद हुसैन, सरताज पठाण, जीएसए अन्सारी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एमआयएमला मिळालेली ९२ हजार मते ही युती आणि आघाडीसाठी धोक्‍याची घंटा समजली जाते.

अनुसूचित जातीसाठी राखीव पश्‍चिम मतदारसंघातून शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी सलग दोनदा विजय मिळवला आहे. या वेळीही त्यांची उमेदवारी कायम असल्याचे बोलले जाते. युती होणार असे सांगितले जात असले तरी, ऐनवेळी धावपळ नको म्हणून भाजपकडून राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, पंकज भारसाखळे यांनी स्वतंत्रपणे तयारी चालवली आहे. या मतदारसंघातही एमआयएमने लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची ७१ हजार मते मिळवत जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे एमआयएमने या जागेवर दावा केला आहे. आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या या मतदारसंघात पुन्हा डॉ. जितेंद्र देहाडे, चंद्रभान पारखे, साहेबराव बनकर यांच्यासह तब्बल दहा जणांनी मुलाखती दिल्यात.

गंगापूर मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत भाजपकडून प्रशांत बंब विजयी झाले होते. मात्र, युतीत २००९ मध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. या वेळी शिवसेनेने या जागेवर दावा करत जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांना मैदानात उतरवण्याची तयारी चालवली आहे. याशिवाय युवा सेनेचे संतोष माने यांचे नावदेखील चर्चेत आहे. आघाडीत काँग्रेसकडे मतदारसंघ असल्याने किरण पाटील डोणगावकर, कलीम सय्यद, संजय जाधव यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

वैजापूर मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आहे. प्रा. रमेश बोरणारे, आर. एम. वाणी यांची नावे चर्चेत असली तरी इथे ऐनवेळी अनपेक्षित चेहरा समोर येऊ शकतो. आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेल्या वैजापूरमधून आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मागितली आहे; पण त्यांना पक्षातून पुतणे अभय पाटील यांच्याशीच स्पर्धा आहे.

कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेवर नाराज हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभवाला हातभार लावला. आता ते पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागलेत. शिवसेनेकडे असलेल्या कन्नडमधून राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले उदयसिंग राजपूत, केतन काजे, अण्णासाहेब शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या, तर काँग्रेसचा थेट चौथ्या क्रमांकावर होता. त्यामुळे राष्ट्रवादीने इथे दावा केला आहे. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी माजी आमदार नामदेव पवार, अनिल सोनावणे इच्छुक आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, सिल्लोड- सोयगाव या तीनही मतदारसंघांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लाखांच्या पुढे मते मिळाली. सिल्लोडमधून काँग्रेसने निलंबित केलेले अब्दुल सत्तार अपक्ष लढण्याची शक्‍यता आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा असल्या तरी अद्याप अंतिम निर्णय नाही. काँग्रेसकडून इथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, प्रभाकर पालोदकर यांनी उमेदवारी मागितली आहे. भाजपकडून सुरेश बनकर, ज्ञानेश्‍वर मोटे, सांडू पाटील लोखंडे, इद्रिस मुलतानी यांची नावे चर्चेत आहेत.

फुलंब्रीत भाजपचे आमदार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे पुन्हा इच्छुक आहेत. मात्र, वयाच्या निकषात पक्ष त्यांना उमेदवारी देईल की नाही, याबद्दल साशंकता आहे. अशा वेळी भाजपकडून अनुराधा चव्हाण, प्रदीप पाटील, विजय औताडे यांनीदेखील तयारी चालवली आहे. काँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे हेच उमेदवार असण्याची दाट शक्‍यता आहे.

पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे हेच पुन्हा मैदानात उतरतील. राष्ट्रवादीकडून माजी आमदार संजय वाघचौरे, अनिल जाधव, अप्पासाहेब निर्मल यांची नावे चर्चेत  आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM and Vanchit Bahujan Aghadi changed political equations in aurangabad