औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे आमदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादेत एमआयएमचे पदाधिकारी, नगरसेवकांच्या बैठकीत सोमवारी (ता. 25) रात्री त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ही बातमी कळताच कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी जल्लोष केला.
वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद आणि मुंबईची एकेक जागा सुटल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीनचे आमदार इम्तियाज जलील यांनीच मैदानात उतरावे, यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वावर दबाव आणला होता. त्यामुळेच पक्षाने मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला यांना औरंगाबादेत पाठवून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवकांचे मत जाणून घेतले होते. या बैठकीत फक्त इम्तियाज जलील यांचेच नाव पुढे करण्यात आले. हा सर्व अहवाल हैदराबादेत ओवेसी यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर आमदार इम्तियाज जलील यांच्यासह 23 नगरसेवक, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे मुख्यालय असलेल्या हैदराबादेतील दारुस्सलाम गाठले.
निवडणूक लढवायची की नाही यावर तेथे सोमवारी (ता. 25) सकाळी 11च्या सुमारास तब्बल दोन तास खल झाला. यामध्ये ओवेसी यांनी प्रत्येकाचे मत जाणून घेतले; तसेच विजयाचे समीकरण कसे राहील, दलित-मुस्लिम मतदानाची टक्केवारी कसा प्रभाव टाकेल, याची विस्तृत माहिती घेतली. यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास पुन्हा यावर बैठक घेण्यात आली. कार्यकर्त्यांचे ऐकून घेतल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत निवडणूक लढविण्याची घोषणा केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.