औरंगाबादेत एमआयएमची अशीही दुचाकी फेरी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 October 2019

एमआयएमने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारत यश मिळविले. मात्र, वंचित बहुजन आघाडीने आता पश्‍चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेले असल्याने एमआयएमची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी उमेदवारांना सोबत घेऊन मंगळवारी दुचाकी फेरी काढली.

औरंगाबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाची औरंगाबादेतील घोडदौड वेगात सुरू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी कंबर कसली आहे. शहरातील तीनही मतदारसंघांत त्यांनी मंगळवारी (ता. 15) दणदणीत दुचाकी फेरी काढली. 

एमआयएमने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारत यश मिळविले. मात्र, वंचित बहुजन आघाडीने आता पश्‍चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेले असल्याने एमआयएमची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी उमेदवारांना सोबत घेऊन मंगळवारी दुचाकी फेरी काढली. 

बुढीलाईन येथील पक्षाचे कार्यालय दारुस्सलाम येथून फेरीस सुरवात झाली. ही फेरी टॉऊन हॉल, बेगमपुरा, छावणी, बाबा पेट्रोलपंप, क्रांती चौक, कोकणवाडी, पदमपुरा, रेल्वेस्टेशन रोड, पीरबाजार चौक, शाहनूरमियॉं दर्गाह, गारखेडा, सेव्हनहिल, चिश्‍तिया कॉलनी, मध्यवर्ती जकात नाका, रोशनगेट, चंपा चौक, चेलिपुरा, शहाबाजार, गांधी पुतळा, सराफा, जुना बाजार, बुढीलाईनपर्यंत ही फेरी काढण्यात आली. 

यावेळी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नासेर सिद्दिकी, औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार अरुण बोर्डे आणि पूर्व मतदारसंघातील उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM motorcycle rally in Aurangabad