AMC : एमआयएम गटनेत्याची अखेर उचलबांगडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

गंगाधर ढगे यांची वर्णी; महापौरांना दिले पत्र 

औरंगाबाद - जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेला मदत केल्यावरून एमआयएम पक्षात खदखद सुरू होती. अखेर गुरुवारी (ता. पाच) पक्षाचे महापालिकेतील गटनेते नासेर सिद्दिकी यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागेवर गंगाधर ढगे यांची गटनेता म्हणून निवड करण्यासाठी जिल्हाध्यक्ष शेख अहमद यांनी महापौरांना पत्र दिले आहे. 

जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे प्रंचड मताधिक्‍क्‍याने निवडूण आले होते. महायुतीकडे असलेल्या संख्याबळापेक्षा जास्त मते मिळाल्यामुळे कॉंग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर पक्षांची मोठ्या प्रमाणात मते फुटल्याचे समोर आले. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात शहरात कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या एमआयएम पक्षाने शिवसेनेला मदत केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एमआयएम नगरसेवकांसोबत "सेटिंग' करण्यासाठी दोन नगरसेवकांनी पुढाकार घेतला होता.

निकालानंतर हे नगरसेवक काही काळ गायब झाल्याने एमआयएम नगरसेवकांत दुफळी निर्माण झाली. बोलणी करणाऱ्या नगरसेवकांना शोधून काढण्यात आले. त्यानंतर गटनेता
बदलण्यासाठी नगरसेवकांनी सह्यांची मोहीमही सुरू केली होती; मात्र काही काळ नगरसेवक शांत होते. असे असतानाच गुरुवारी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख अहमद शेख इलियास यांनी महापौरांना पत्र देत एमआयएमच्या गटनेतेपदी नासेर सिद्दिकीऐवजी गंगाधर ढगे यांची निवड करण्याची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमपक्षातील खदखद समोर आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM replaced AMC group leader