हायटेक मुरुम चोर (कुठे ते वाचा) 

अनिल जमधडे
रविवार, 22 डिसेंबर 2019

हर्सुल, सावंगी, आश्रफपुर या भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी मुरुम चोरांच्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. हा संपुर्ण परिसर सध्या विकासाच्या उंबरठ्यावर आहे. मोठ्या प्रमाणावर खाजगी जमिनी पडून असल्याने मुरुमचोर रात्री दहानंतर सर्रास जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन हायवाद्वारे मुरुम चोरुन नेत आहेत. 

औरंगाबाद : शहर व परिसरातील नायगाव-सावंगी, अश्रफपुर भागात गेल्या काही दिवसांपासून मुरूम चोरांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी खाजगी जमिनींवरील मुरुम जेसीबी लावून हायवा ट्रकच्या सहाय्याने पळवण्यात येत आहे. 

हेही वाचा : दुचाकीवर धम्मचक्र लावले म्हणून... 

हायटेक टोळ्या 

शहराच्या परिसरामध्ये गौण खनीजांची चोरी करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत. शासकीय आणि गायरान जमिनीवरील मुरुम आणि डोंगरातील दगड (डब्बर) पळवणाऱ्या या टोळ्यांनी विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या खासगी जमिनींनाही लक्ष्य केले आहे. हर्सुल, सावंगी, आश्रफपुर या भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी मुरुम चोरांच्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. हा संपुर्ण परिसर सध्या विकासाच्या उंबरठ्यावर आहे. मोठ्या प्रमाणावर खाजगी जमिनी पडून असल्याने मुरुमचोर रात्री दहानंतर सर्रास जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन हायवाद्वारे मुरुम चोरुन नेत आहेत. 

आता खाजगी जमीनीवर लक्ष 

गायरान आणि उघड्या डोंगरांना लक्ष करणारे माफीया आता सर्रास बिनधास्तपणे खाजगी जमिनींनाही टार्गेट करत आहेत. या भागातील कबीर मठाच्या परिसरात गट क्र. 5 व गट क्र. 8 मध्ये नियोजीत कृषी कर्मचारी सहकारी संस्था आहे. संस्थेच्या तब्बल वीस एक जमिनीवर चोरांनी मोठ्या प्रमाणावर मुरुम चोरुन नेला आहे. गृहनिर्माण प्रकल्पासाठी सपाटीकरण करुन ठेवलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर खड्डे केल्याने संस्थेचे प्रचंड नुकसान झाल्याची तक्रार संस्थेचे मुख्य प्रवर्तक महेंद्र ठोंबरे यांनी गौण खनीज अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि फुलंब्री पोलिस ठाण्याकडे केल्या आहेत. याच भागात आणखी काही खाजगी जमीनीवरील मुरुम चोरुन नेण्यात येत आहे. मुरुम माफीयांची या भागात दहशत निर्माण झाल्याने अनेकांनी माफीयांच्या भीतीपोटी तक्रारी केल्या नसल्याचे या भागातील नागरीक सांगत आहेत. 

येथे क्‍लिक करा : समृद्धीच्या कामाचा असाही साईड इफेक्‍ट 

पोलिसांच्या गस्तीवर मर्यादा 

फुलंब्री पोलिस ठाण्याची हद्द हर्सूल जकात नाक्‍यापर्यंत आहे. हर्सुलला लागून असलेल्या या भागाची हद्द तब्बल वीस किलोमिटर अंतर असलेल्या फुलंब्री पोलिस ठाण्याकडे आहे. मोठे अंतर असल्याने पोलिसांच्या गस्तीवर मर्यादा येते, त्याचाच फायदा मुरुम चोर घेत आहेत. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवून मुरुम चोरांना चाप लावावा अशी मागणी करण्यात येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mineral Theft News