गायब स्वच्छतागृहांचा महापालिका घेणार शोध

Municipal-Toilet
Municipal-Toilet

औरंगाबाद - पार्किंगच्या जागांप्रमाणेच शहरातील व्यापारी संकुलांतील स्वच्छतागृहे गायब झाली आहेत. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे. स्वच्छतागृहांच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी महिला सदस्यांनी सोमवारी (ता.२२) झालेल्या सर्वसाधारण सभेत केली. त्यावर व्यापारी संकुलांची तपासणी करण्याचे आदेश सभापती राजू वैद्य यांनी प्रशासनाला दिले. 

शहराची लोकसंख्या १५ लाखांच्या घरात असताना केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यातील अनेक स्वच्छतागृहांची साफसफाई होत नाही. अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे ‘आम्ही जायचे कुठे?’ असे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करून या समस्येला वाचा फोडली होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महिला नगरसेविकांनी पाच स्वच्छतागृहांची कामे तातडीने पूर्ण करावीत; अन्यथा सभा होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर सोमवारी शिल्पाराणी वाडकर यांनी मुख्य बाजारपेठेतील व्यापारी संकुलांच्या स्वच्छतागृहांचा विषय उपस्थित केला.

दिवाळी व इतर सणांच्या काळात महिला खरेदीसाठी बाहेर पडतात; मात्र अनेक व्यापारी संकुलांमध्ये स्वच्छतागृहांची व्यवस्था नसते. काहींनी बांधकाम परवानगी घेताना दाखविलेले स्वच्छतागृह नंतर गायब केले आहे, असा आरोप महिला सदस्यांनी केला. नगररचना विभागाचे उपअभियंता ए. बी. देशमुख यांनी याबाबत पाहणी करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले.

सभापती श्री. वैद्य यांनी किमान मुख्य रस्त्यावरील व्यापारी संकुलांची पाहणी करून कोणी अतिक्रमण केलेले असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

पार्किंग गायब, वाहने रस्त्यांवर
शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या व्यापारी संकुलांच्या पार्किंग गायब असल्याने समोरील रस्त्यांवर पार्किंग केली जात आहे. यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिलेले असताना प्रशासन या आदेशाला जुमानत नसल्याचा आरोप श्रीमती वाडकर यांनी केला. त्यावर देशमुख यांनी पार्किंगसंदर्भात अनेक कारवाया केल्या होत्या, नव्याने आढावा घेऊ, असे आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com