पालिका निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नांदेड - राज्यभरात होत असलेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. सात) येथे पत्रकार परिषदेत केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वास्तवाचे भान न ठेवता केंद्राने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे महिनाभरापासून सर्वसामान्य अडचणीत असल्याचे ते म्हणाले.

नांदेड - राज्यभरात होत असलेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. सात) येथे पत्रकार परिषदेत केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वास्तवाचे भान न ठेवता केंद्राने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे महिनाभरापासून सर्वसामान्य अडचणीत असल्याचे ते म्हणाले.

श्री. चव्हाण म्हणाले, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होतात आणि मतमोजणी प्रक्रिया, निकाल मात्र एका विशिष्ट दिवशी जाहीर केले जातात. राज्य निवडणूक आयोगानेही नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये हीच पद्धत वापरायला हवी होती. राज्यात पालिका निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला आहे. सध्या या निवडणुकीचा दुसरा, त्यानंतर तिसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर केल्यामुळे त्याचा नंतरच्या टप्प्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून भाजपने आपली सोय करून घेतली आहे.

मंत्रिमंडळातील मंत्री निवडणुकीच्या कामात हस्तक्षेप करून उमेदवारासाठी फोनवर धमक्‍या देत आहेत. दुसरीकडे मंत्र्यांच्या गाडीत नोटा सापडत आहेत. केंद्र, राज्यात आमचे सरकार आहे, आम्ही विविध योजना राबविणार असे सांगून धमकीवजा आवाहनही सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. त्यातूनही सत्तेचा दुरुपयोग, गैरवापर होत आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.

विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही पक्षाला यश मिळाले आहे. राज्यातील पालिकांत 727 जागा आणि 26 नगराध्यक्ष कॉंग्रेसचे निवडून आले आहेत. मतांची टक्केवारीही वाढली आहे.

निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांतही कॉंग्रेस अग्रेसर राहील, संपूर्ण निकालात आमचा पक्षच राज्यात पहिल्या क्रमांकावर राहील, असा दावाही त्यांनी केला.

काळ्या पैशाविरुद्ध कारवाईला कॉंग्रेसने सुरवात केली. आता केंद्राने घेतलेल्या निर्णयाला विरोध नाही; पण नोटबंदीचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन घ्यायला हवा होता. नोटबंदी निर्णयाला आता महिना होत आहे. एटीएम, बॅंकांमध्ये अजूनही रांगा आहेत. नोटांबाबत केंद्र सरकार रोज आश्वासने आणि रोज नवनवीन आदेश काढत आहे. पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने सर्वच घटकांवर विपरीत परिणाम होत आहे. बाजारपेठ ठप्प आहे. ग्राहकांसह व्यापारी, शेतकरी, कामगारांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचेच हाल होत असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले.

भाजपकडून "एमआयएम'चा वापर
भाजपकडून एमआयएम पक्षाचा वापर होत असून हे दोन्ही पक्ष एकमेकांना छुपे सहकार्य करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. राष्ट्रवादीसोबत आम्ही आघाडी करायला तयार आहोत; मात्र त्यांना आधी शिवसेना व भाजपशी काडीमोड घ्यावा लागेल. राष्ट्रवादी अनुकूल असेल तर आम्हीही तयार असल्याचे ते म्हणाले. लिजेंड प्रकरणाबाबत प्रश्‍न उपस्थित झाल्यावर, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून अधिक माहिती व प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

आरक्षणप्रश्‍नी सरकारच साशंक
विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत ठराव मांडण्याबाबतच्या भूमिकेवर श्री. चव्हाण म्हणाले, 'शपथपत्र व प्रतिज्ञापत्र वेळेत सादर केले नाही म्हणून भाजपच्या सरकारला या आधीच न्यायालयाने फटकारले आहे. सरकार दिशाभूल करत असून न्यायालयात एक आणि बाहेर दुसरेच मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आरक्षणाच्या विषयावर भाजप सरकारच साशंक असल्याचे दिसते.''

इतरांच्या आरक्षणावर बाधा येणार नाही, याकडे लक्ष देऊन मराठा, मुस्लिम, धनगर व इतरांना आरक्षण द्यावे, अशी आमची भूमिका असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Misuse of power in the municipal elections by BJP