सत्तारांकडे दुर्लक्ष करून नामदेव पवारांकडे कार्यभार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

औरंगाबाद - कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांवर नगरपालिका निवडणुकीतील अपयशाचे खापर फोडत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा अस्त्रावर अखेर कॉंग्रेसने उतारा केला आहे. औरंगाबाद शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानेच पक्षाच्या सरचिटणीसांनी रविवारी पवारांना नियुक्तीपत्र दिले. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच दबाव तंत्राचा वापर करत स्वपक्षाची कोंडी करु पाहणाऱ्या सत्तार यांना हा मोठा दणका समजला जातो. 

औरंगाबाद - कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांवर नगरपालिका निवडणुकीतील अपयशाचे खापर फोडत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा अस्त्रावर अखेर कॉंग्रेसने उतारा केला आहे. औरंगाबाद शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानेच पक्षाच्या सरचिटणीसांनी रविवारी पवारांना नियुक्तीपत्र दिले. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच दबाव तंत्राचा वापर करत स्वपक्षाची कोंडी करु पाहणाऱ्या सत्तार यांना हा मोठा दणका समजला जातो. 

जिल्ह्यातील चारपैकी दोन पालिकेत नगराध्यक्ष व सत्ता मिळाल्यावरही अब्दुल सत्तार यांनी प्रदेशाध्यक्षांसह विरोधीपक्ष नेते, माजी मुख्यमंत्र्यांसह कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांवर प्रचारासाठी वेळ न दिल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्तारांनी चव्हाणांचेही नाव घेतल्याने या राजीनाम्याकडे एक नाटक म्हणून पाहिले गेले. पश्‍चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असे देखील या वादाला स्वरूप देण्यात आले होते. सत्तार यांनी चव्हाणांकडे पाठवलेला राजीनामा अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही. या वादाचा परिणाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर होऊ नये याची काळजी नामदेव पवार यांच्याकडे पदभार देताना घेण्यात आली आहे. या निर्णयामागे विखे, थोरात यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांची भूमिकाच महत्त्वाची ठरली आहे. सत्तार यांच्या राजीनामा प्रकरणाचा बोलविता धनी म्हणून प्रदेशाध्यक्षांकडेच संशयाची सुई जात असल्याने चव्हाण यांनी देखील नामदेव पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा पदभार सोपवण्याला हिरवा कंदील देत आपल्या विरोधातील चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. 

नामदेव पवार पॉवरफुल ठरतील? 
औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीची कार्यकारिणी अद्याप अस्तित्वात आलेली नाही. जिल्हाध्यक्ष व शहराध्यांची नेमणूक झाल्यानंतर नामदेव पवार यांनी संपूर्ण जिल्ह्यात संवाद यात्रा काढून कार्यकारणी निवडण्याचा निर्णय घेत पारदर्शकतेचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. पण ही संवाद यात्रा लांबल्याने कार्यकारणी अजूनही अस्तित्वात येऊ शकली नाही. बहुजन समाजाला नेतृत्व मिळावे हा दृष्टिकोन ठेवून नामदेव पवार यांची शहराध्यक्षपदी तर अल्पसंख्याक म्हणून सत्तार यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते. शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या पवार यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कन्नडमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. शहराध्यक्ष झाल्यानंतरही अपवाद वगळता त्यांनी कॉंग्रेसच्या बैठका, मेळाव्यांना फारशी हजेरी लावलेली नाही. जनसंपर्काचा अभाव असताना देखील कॉंग्रेसने पवारांवर विश्‍वास दाखवला आहे. सत्तार विरोधकांची मदत घेऊन जिल्हा परिषदेत पवारांची पॉवर दिसली तरच हा निर्णय योग्य ठरेल. विशेष म्हणजे नामदेव पवारांना बळ देण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील विखे, थोरात कामाला लागले आहेत. थोरात हे स्वतः औरंगाबादेत दाखल झाले असून जिल्हा परिषद निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. 

सत्तारांच्या जखमेवर मीठ 
नगरपालिका निवडणुकीत वरिष्ठ नेते फिरकले नसल्याचा आरोप करणाऱ्या सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर नामदेव पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली आहे. शिवाय पवारांच्या पाठीशी ताकद निर्माण करून जिल्हा परिषदेत मोठा विजय मिळवण्याचे नियोजन विखे, थोरात या मंडळीने केले आहे. त्यामुुळे सत्तार यांच्या जखमेवर मीठ चोळले जाणार आहे. पराभवावर जाहीर वाच्यता, आरोप, प्रत्यारोपाची कॉंग्रेसची संस्कृती नसली तरी सत्तार यांच्यासारखे आक्रमक नेते त्यावर प्रतिक्रिया देतातच. त्याचा परिणाम त्यांना बाजूला सारून पुढे जाण्यात झाला. दिल्ली शिवाय कुुणाचेही ऐकणार नाही अशी ताठर भूमिका सत्तार यांच्या अंगलट आली हेच यावरून स्पष्ट होते. यापुुढे जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालणार नाही केवळ तालुक्‍या पुरताच विचार करेन हे देखील सत्तार यांनी जाहीर केल्याने भविष्यात त्यांच्या अडचणीत वाढच होणार आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा मोठा प्रभाव तालुका व ग्रामीण भागावर आहे. त्यामुळे कॉंग्रेसला सिल्लोड वगळता इतर ठिकाणी फटका बसला तर त्याचे खापर सत्तार यांच्यावर फोडण्यात येईल. तूर्तास सत्तार यांचे बंड मोडून काढण्याच्या दिशेने नेत्यांनी उचललेले हे पहिले पाऊल मानावे लागेल.

Web Title: mla abdul sattar resign