सेलू-जिंतूर येथे सायकल ट्रॅक उभारणार

विलास शिंदे
Sunday, 24 January 2021

आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, सेलूचे नगराध्यक्ष स्वच्छतेच्या बाबतीत कटीबद्ध आहेत. शहरातील नागरिकही तेवढेच स्वच्छतेसाठी जागरूक आहेत.

सेलू (परभणी) : स्वच्छ भारत अभियान आणि वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्लास्टिक मुक्ती व वृक्ष लागवड करणे महत्वाचे असून यासाठी नागरिकांनी प्रदुषण मुक्तीवर भर देणे गरजेचे आहे. तसेच शहरात नागरिकांनी सायकलचा वापर करावा त्यासाठी सेलू-जिंतूर शहरात सायकल ट्रॅकची उभारणी मी आमदार निधीतून करणार असल्याचे प्रतिपादन आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी नगर पालिकेच्यावतीने आयोजित सायकल रॅली प्रसंगी रविवारी  (ता.२४) केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सायकल रॅलीचा प्रारंभ शहरातील लोकमान्य टिळक पुतळ्यास अभिवादन करून आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करून दिली. यावेळी खासदार संजय जाधव, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने, अशोक (नाना) काकडे, दादासाहेब टेंगसे, राम खराबे-पाटील, नंदकिशोर बाहेती, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल, प्रभारी पोलिस निरिक्षक विजय रामोड, वैद्यकिय अधिक्षक डाॅ. संजय हरबडे, मुख्याधिकारी जयंत सोनवणे, देविदास जाधव, प्राचार्य डाॅ.शरद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. शहरातील प्रमुख रस्त्यावरून सायकल स्वारांनी सायकल चालवून प्रदूषण मुक्तीचा संदेश दिला. शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात समारोपाचे आयोजन करण्यात आले होते.

आमचा पाहू नका अंत, वैद्यकीय महाविद्यालय द्यावे तुरंत; परभणीकर संघर्ष समितीचे धरणे आंदोलन

पुढे बोलताना आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, सेलूचे नगराध्यक्ष स्वच्छतेच्या बाबतीत कटीबद्ध आहेत. शहरातील नागरिकही तेवढेच स्वच्छतेसाठी जागरूक आहेत. यामुळे येथील नगर पालिका देशभरात २६ व्या क्रमांकावर असून लवकरच क्रमांक ०१ वर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक (नाना) काकडे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, सायकल पट्टु शहजाद पठाण, शंकर फुटके, अरूण रामपुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद बोराडे यांनी केले. तर सूत्रसंचलन मोहन बोराडे तर आभार गिरिष लोडाया यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्थायी समिती सभापती, नगरसेवक, कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

सायकल रॅलीमध्ये शहरासह जिल्हाभरातील जिंतूर रॅन्डियर्स व परभणी सायकलर्स या ग्रुपचे सायकल स्वार सहभागी झाले होते. सायकल स्पर्धा शारिरीक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या चांगली असते. येथील नगर पालिकेचे काम उत्तमच आहे. या नगर पालिकेला पहिल्या पाचमध्ये बक्षिस मिळावे, अशा सदिच्छा खासदार संजय जाधव यांनी यावेळी दिल्या.

दिव्यांग डाॅ.प्रशांत मुंढे यांचा सत्कार

जिंतूर येथील जिंतूर रॅन्डीयर्स ग्रूपचे सदस्य दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले डाॅ. प्रशांत मुंढे हे शहरात रुग्णांची सेवा बजावत आहेत. त्यांनी अद्यापपर्यंत ३०० किलो मीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला आहे. त्यांचा सत्कार खासदार संजय जाधव, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Meghna Sacore Bordikar has said that a cycle track will be set up at Selu Jintur