मराठवाड्यातील हे आमदार नॉट रिचेबल, चर्चेला उधाण

जगदीश पानसरे
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

 

  • अजित पवारांसोबत आहेत की शरद पवारांसोबत? 
  • राजकीय चर्चेला उधाण
  • चव्हाणांच्या भूमिकेकडे मराठवाड्याचे लक्ष 

औरंगाबाद - राज्यात निर्माण झालेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे कोण कोण आमदार अजित पवारांसोबत आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सरकार स्थापनेच्या घडामोडीत सतीश चव्हाण यांची भूमिका फारशी महत्त्वाची ठरणार नसली तरी या प्रसंगी ते अजित पवारांसोबत आहेत की शरद पवारांसोबत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, चव्हाण यांचा भ्रमणध्वनी बंद असून ते सध्या नॉट रिचेबल असल्याने वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हे गेल्या दोन टर्मपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. याशिवाय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळात देखील ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

आहेत कौटुंबिक संबंध

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेत्या सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. पवार कुटुंबांचे विश्वासू अशी ओळख असलेले चव्हाण आज राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत कुणाच्या बाजूने उभे आहेत याची चर्चा न झाली तर नवलच.

 राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे एकत्रित सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना काल वेग येताच आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड होऊन शपथविधी पार पडला. या राजकीय भूकंपाने सगळ्याच राजकीय पक्षांची झोप उडाली.अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांचा पाठिंबा आहे याची चर्चा सुरू झाली, तेव्हा सहाजिकच मराठवाडा आणि राज्यातील कोणते आमदार कुणासोबत आहे याच्या चर्चांनाही उधान आले.

अजित पवार यांचे विश्वासू

सतीश चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार असून ते अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात . त्यामुळे या राजकीय भूकंपामध्ये सतीश चव्हाण यांची काही भूमिका होती का?  त्यांना यासंदर्भात काही माहिती होती का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 यासंदर्भात सतीश चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सकाळपासूनच त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.  सतीश चव्हाण नॉटरिचेबल असल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - मागील २९ दिवसांत असे बदलत गेले महाराष्ट्राचे राजकारण
देशमुखाच्या गढीत काय चालंलय - लातूर महापालिकेत काँग्रेसमध्ये अस्वस्थता
काय होणार ? धनंजय मुंडे काका-सोबत की पुतण्यासोबत....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Satish Chavan's mobile phone not rechargeable