esakal | कोरोनाग्रस्तांना सोयीसुविधा कमी पडत असल्याने आमदार मुटकुळेंचे उपोषण

बोलून बातमी शोधा

Hingoli district

रुग्णाचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहे, कोरोना रूग्णासाठी आवश्यक असणारे आयसीयु बेड शासकीय व खाजगी कोवीड सेंटरमध्ये उपलब्ध होत नाहीत.

कोरोनाग्रस्तांना सोयीसुविधा कमी पडत असल्याने आमदार मुटकुळेंचे उपोषण
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली जिल्हयात कोरोना प्रतीबंधक औषधी, कोरोनाग्रस्त रूग्णाकरिता लागणा-या सोयीसुविधा, ऑक्सिजन इ.च्या तुटवडयाच्या निषेधार्थ व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

या संदर्भात आमदार मुटकुळे यांनी सोमवारी (ता. १९) जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते. दरम्यान, जिल्हयात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. परंतु रूग्णसंख्येच्या तुलनेत आरोग्य विषयक सोयीसुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्णाचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहे, कोरोना रूग्णासाठी आवश्यक असणारे आयसीयु बेड शासकीय व खाजगी कोवीड सेंटरमध्ये उपलब्ध होत नाहीत.

हेही वाचा: संचारबंदीत ७.३५ लाख कुटुंबाना मिळणार मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ

कोव्हिड सेंटरमध्ये तसेच खाजगी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठया प्रमाणावर भासत आहे. कोरोना रूग्णासाठी आवश्यक असणारे रेमडीसीव्हर इंजेक्शन शासकीय रुग्णालयात वेळेवर उपलब्ध होत नाहीत व बाजारातसुध्दा उपलब्ध नाहीत. त्यामुळे काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी असल्याचे निवेदनात नमूद केले होते.

जिल्हयात कोरोना प्रतीबंधक लस आवश्यक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण थांबले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. आरटीपीसीआर चाचण्याचे निष्कर्ष येण्यास सात ते आठ दिवस लागत आहेत. शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. तसेच अनेक वेळा पाणीसुध्दा उपलब्ध नाही. पाण्याचे फिल्टर युनीट नादुरूस्त झाले असून पिण्याच्या पाण्यासाठी रूग्णांना व नातेवाईकांना पाणी बाहेरून विकत घ्यावे लागत आहे. या सर्व गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून रूग्णाच्या जिवाशी खेळ खेळल्या जात आहे.

हेही वाचा: कोरोनाचे पोतरा येथील यात्रेवर संकट

या बाबत जिल्हाशल्य चिकीत्सक व जिल्हाधिकारी यांच्याशी वारंवार तोंडी चर्चा केली आहे. प्रशासनाने आतापर्यंत कोव्हिड संदर्भात करावयाच्या उपाययोजना संदर्भात एक ही बैठक लोकप्रतीनिधीसोबत आयोजित केली नाही. जिल्ह्यात पुरेसा औषधीसाठा, ऑक्सिजन पुरवठा, रेमडीसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा आवश्यक आयसीयु बेड कोरोना प्रतीबंधक लस इ. सर्व आवश्यक बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केली होती.

त्याप्रमाणे मंगळवारी सहकारी कार्यकर्त्यासोबत कोव्हिड-१९ च्या व जिल्हा प्रशासनाचे सर्व नियमाचे पालन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यात आमदार मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत सोनी, संतोष टेकाळे, के.के. शिंदे, अशोक ठेंगल, गजानन शिंदे, रजनी पाटील, बंडू कराळे, हमीद प्यारेवाले आदी सहभागी झाले आहेत.