जेव्हा आमदारच घालतात गुटख्याच्या अड्ड्यावर छापा ! (व्हिडीओ)

मनोज साखरे 
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

एक महिन्याचा वेळ द्या आम्ही कारवाया करु, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. परंतू यानंतरही कारवाया होत नसल्याचा आरोप करुन मुदत संपताच आमदार इम्तियाज जलील यांनी स्वत:च शिवशंकर कॉलनीत दुपारी गुटख्याच्या अड्ड्यावर धाव घेतली.

औरंगाबाद : औरगांबादेत बिनधास्त सुरु असलेल्या गुटख्याच्या उद्योग बंद व्हावा म्हणून अल्टीमेटम देऊनही कारवाया होत नसल्याने संतप्त एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी स्वत:च शिवशंकर कॉलनीत गुरुवारी (ता. 21) एका गुटख्याच्या अड्ड्यावर जाऊन पोलिसांना बोलवित छापा घातला. यानंतर पोलिसांनी कार्यवाही सुरु केली. 

शहरात गुटख्यांचे अड्डेच अड्डे असून याविरोधात मागील महिन्यात आमदार इम्तियाज जलील यांनी यल्गार पुकारला होता. नशाबंदी आंदोलनाचा इशारा त्यांनी देताच पोलिसांनी कारवाईचे आश्‍वासन देत बैठक घेतली. यानंतर एक महिन्याचा वेळ द्या आम्ही कारवाया करु, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. परंतू यानंतरही कारवाया होत नसल्याचा आरोप करुन मुदत संपताच आमदार इम्तियाज जलील यांनी स्वत:च शिवशंकर कॉलनीत दुपारी गुटख्याच्या अड्ड्यावर धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना बोलावून घेतले. परंतु पोलिसांकडूनही येण्यास विलंब झाला.

उपायुक्त उशिरा घटनास्थळी पोचल्यानंतर इम्तियाज जलील यांनी त्यांना कानपिचक्‍या दिल्या. पोलिस ताफ्यात शिवशंकर कॉलनीतील रस्त्यावर असलेल्या घरातील एका खोलीचे कुलूप तोडण्यात आले. त्यावेळी दोन खोल्यात दडवलेला गुटख्याचा साठा सापडला. गुटखा दाखवतच त्यांनी पोलिसांवर शाब्दीक हल्ला चढविला. पोलिसांच्या आशिर्वाद व हप्तेखोरीमुळे गुटखा विक्री सुरु असून प्रत्येकाचा यात वाटा असल्याचे सांगत हा वाटा मुख्यमंत्र्यांपर्यंत जातो काय याबाबत त्यांनाच आपण विचारणार असल्याचेही ते म्हणाले. 


विधानसभेत आवाज उठविणार -
पोलिस कारवाई करो अथवा न करो. आपण स्वत:च कारवाई सुरु केली, पोलिसांनी आपणावर गुन्हा नोंदवला तरी मागे हटणार नाही. हप्ता मिळत असल्याने पोलिसांच्या मदतीने अवैध धंदे सुरु आहेत. याबाबत मी विधानसभेत आवाज उठविणार असुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले. 

Web Title: The MLAs raided the gutka base in aurangabad