मनसेचे इंजिन "खिळखिळे'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - गेल्यावेळी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल आठ जागा जिंकून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. मात्र, विद्यमान जिल्हा परिषदेत आठ सदस्य असलेल्या मनसेने या वेळी केवळ सातच गटांत उमेदवार दिले आहेत. दरम्यान, मनसेचे इंजिन जिल्ह्यात "खिळखिळे' झाल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद - गेल्यावेळी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल आठ जागा जिंकून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. मात्र, विद्यमान जिल्हा परिषदेत आठ सदस्य असलेल्या मनसेने या वेळी केवळ सातच गटांत उमेदवार दिले आहेत. दरम्यान, मनसेचे इंजिन जिल्ह्यात "खिळखिळे' झाल्याचे चित्र आहे.

मनसेने 2012 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करीत 22 जागा लढवून तब्बल आठ जागा जिंकल्या होत्या. आठ जागा जिंकून किंगमेकर ठरलेल्या मनसेला पाच वर्षांत उतरती कळा लागली. पक्षाचा कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याने एकएक करून कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, तर नेते, सदस्यांनीही रामराम ठोकला. पक्षाचे विद्यमान सदस्य माजी सभापती सुनील शिंदे यांनी भाजप, तर विद्यमान बांधकाम सभापती यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. दीपाली काळे यांनीही कॉंग्रेसची वाट धरली. माजी सभापती बबन कुंडारे कॉंग्रेसच्या जवळ गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पक्षाला उमेदवारही शोधणे अवघड झाले.

सध्या मनसेचे जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर यांनी पाल, विद्यमान समाजकल्याण सभापती शीला चव्हाण यांनी आडूळ, तर विजय चव्हाण यांनी बिडकीन गटातून उमेदवारी दाखल केली आहे. जिल्ह्यात मनसेचे इंजिन धावण्यासाठी पटरीरूपी कार्यकर्त्यांची फळी आज पक्षाकडे राहिली नसल्याचे सर्वच जण बोलताना दिसतात. त्याचा प्रत्यय फक्त 7 गटांतच उमेदवार दिल्यावरूनही दिसून येतो.

शिवसेना-भाजपचे टेन्शन कमी
शिवसेना-भाजप यांची युती तुटल्याने या दोन्ही पक्षांना अगोदरच मतविभाजनाचे टेन्शन आहे. त्यातच मनसेने जास्त गटांत उमेदवार दिले तर आणखी मतविभाजन होऊन कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा फायदा होण्याची शक्‍यता होती. आता मनसेचे 7 गटांतच उमेदवार असल्याने शिवसेना, भाजपचे टेन्शन काही प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात आहे. आता बहुतांश गटात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातच मुख्य लढत रंगणार आहे.

आमची ज्या गटात शक्ती आहे तेथेच लक्ष केंद्रित करून उमेदवार दिले आहेत. सात गटांत आमचे उमेदवार आहेत. मी स्वतः पाल गटातून उमदेवारी दाखल केली आहे. आम्ही अगोदरपासूचन ठराविक गटांवर लक्ष केंद्रित केले होते.
भास्कर गाडेकर, जिल्हाध्यक्ष, मनसे

Web Title: mns in aurangabad