रस्त्यासाठी महापालिकेच्या विरोधात मनसेचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

औरंगापुरा भाजीमंडईलगत असलेल्या सुराणा कॉम्प्लेक्‍ससमोरील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना पायी चालणे देखील अवघड झाले आहे.

औरंगाबाद - औरंगपुरा भागातील सुराणा कॉम्प्लेक्‍स समोरील अत्यंत खराब झालेल्या रस्त्याचे काम करण्यात यावे, या मागणीसाठी महापालिकेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी (ता. 3) दुपारी आंदोलन करण्यात आले. महापालिका बरखास्त करण्याची मागणी करत या वेळी घोषणाबाजी करण्यात आली. 

औरंगापुरा भाजीमंडईलगत असलेल्या सुराणा कॉम्प्लेक्‍ससमोरील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना पायी चालणे देखील अवघड झाले आहे. या कॉम्प्लेक्‍सला लागूनच महापालिकेने ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी कंपोस्टींग पीट तयार केले आहे. हे कंपोस्टींग पीट कचऱ्याने ओव्हरफ्लो झाले असून, नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. त्यानंतरही महापालिकेने दखल घेतली नाही. म्हणून मंगळवारी दुपारी महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली. शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महापालिका 'बरखास्त करा बरखास्त करा, महापालिका बरखास्त करा', 'महापालिकेने चोरलेल्या रस्त्याचे काम झालेच पाहिजे', अशा जोरदार घोषणा दिल्या. रस्त्यात बसून कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे वाहनधारकांची यावेळी तारांबळ उडाली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MNS movement against the municipal corporation for the road