coronavirus - कोरोनाशी मैदानात लढणाऱ्यांना हवीत आधुनिक साधने 

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 7 April 2020

  • पुरेशा एन- ९५ मास्क, सॅनिटायझरची गरज 
  • अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाइड्रोक्सी क्लोरोक्वीन डोसचीही गरज 
  • पीपीई किटची उपलब्धताही वाढवावी 

बीड - कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे; परंतु याच काळात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या पोलिसांमुळे सर्वांनाच अस्वस्थ केले होते. सुदैवाने सर्वच पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता हाच प्रकार धडा समजून आरोग्य विभागाने कोरोनाशी मैदानात लढणाऱ्या सैनिकांनाही आधुनिक आणि पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा थेट रुग्णांशी संबंध येतो, त्यांना एन- ९५ मास्क, सॅनिटायझरचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. वैद्यकशास्त्रानुसार सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाइड्रोक्सी क्लोरोक्वीन (एससीक्यू-४००) या गोळ्यांचा डोस देणेदेखील आवश्यक आहे.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...  

आता जिल्हा वार्षिक योजना, लोकप्रतिनिधी यांनी भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून विलगीकरण व अलगीकरण वॉर्डांची उभारणी केली जात आहे. रुग्णांसाठी व्हेंटिलेटरही खरेदी केले जाणार आहेत; पण आता या डॉक्टर व इतर मंडळींना पुरेशी संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

आता सुरक्षेचीच गरज 
तबलिगी जमातमधील त्या १२ जणांचा २९ पोलिसांसह इतर चार अशा ३३ शासकीय कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क आला होता. त्यामुळे कायम शून्यावर असलेल्या अख्ख्या बीड जिल्हावासीयांची धडधड वाढविली होती; पण हे संकट टळले आहे; मात्र आता यापुढे योगावर विसंबून राहण्यापेक्षा अधिक सुरक्षित राहण्याची गरज आहे. 

हेही वाचा -  ‘हे’ माध्यम आहे एकाग्रता वाढविण्यासाठी झक्कास, कोणते? ते वाचाच  

मैदानात लढणाऱ्यांना हवा पुरेसा साठा 
कॅज्युल्टी, ओपीडीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह नर्स, मामा, ब्रदर यांचा थेट रुग्णांशी संपर्क येतो. ग्रामीण भागात आता बाहेरून आलेल्यांचे फेरसर्वेक्षण सुरू असून गरज असल्यास त्यांची आरोग्य तपासणीही करावी लागणार आहे. त्यामुळे या सर्व घटकांना एन- ९५ मास्क, पुरेसे सॅनिटायझर आणि वैद्यकशास्त्रानुसार त्यांना हाइड्रोक्सी क्लोरोक्वीन- ४०० या गोळ्यांच्या डोसची गरज आहे. गरजेनुसार पीपीई किटदेखील पुरेसे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 

हेही बघा - Video:कोरोना हरेल...माझा देश जिंकेल...!

ठीकठाकही नाही आणि इतकेही कमी नाही 
एन- ९५ मास्क, सॅनिटायझर व पीपीई किट पुरेसे असून सर्वत्र पुरवठा केला आहे. गरजेनुसार सर्वांना नियमित या वस्तू भेटत आहेत, असे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत; परंतु परिस्थिती इतकीही ठीकठाक नाही. सर्वांना अद्याप हाइ़ड्रोक्सी क्लोरोक्वीनचे डोस भेटलेले नाहीत. तर, आम्हाला काहीच नाही, वस्तू द्या, अशी मागणी होत असली तरी त्यातही तेवढे तथ्य नाही; परंतु लढणाऱ्या या घटकाचे मनोधैर्य टिकविण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात. गरजेनुसार सर्वांना साहित्य भेटणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modern equipment for those who want to fight in the corona field