व्यंकटी शिंदे व टोळीविरुद्ध ‘मोक्का’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

व्यंकटी मुंजाजी शिंदे व त्याच्या टोळीने सन २००५ पासून आजपर्यंत उपलब्ध अभिलेखाप्रमाणे एकूण ४२ गुन्हे केलेले आहेत. त्यामध्ये खुनाचे तीन गुन्हे, खुनाचा प्रयत्न करण्याचे सात व इतर अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

परभणी : अतिशय हिंसक पद्धतीने गुन्हे करून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण होईल असे गुन्हे घडवून आणणाऱ्या परभणी शहरातील व्यंकटी शिंदे याच्यासह त्याच्या टोळीतील १२ जणांविरुद्ध विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड यांनी ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी (ता. १५) मंजुरी दिली आहे.

व्यंकटी मुंजाजी शिंदे व त्याच्या टोळीने सन २००५ पासून आजपर्यंत उपलब्ध अभिलेखाप्रमाणे एकूण ४२ गुन्हे केलेले आहेत. त्यामध्ये खुनाचे तीन गुन्हे, खुनाचा प्रयत्न करण्याचे सात व इतर अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. या टोळीच्या कामकाजाची पद्धत अतिशय हिंसक व निर्घृण आहे. सुपारी घेऊन खून करणे, दोन पक्षांच्या वादातील पैशाच्या वसुलीसाठी एका पक्षामार्फत सुपारी घेऊन पैसे वसूल करून देणे, ज्यामुळे टोळीची दहशत कायम राहील अशा पद्धतीने भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी टोळीमार्फत खून घडवून आणणे, टोळीविरुद्ध तक्रार करणाऱ्यास मारहाण करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

हेही वाचा - विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

प्रस्तावाला मंजुरी
या गुन्हेगारी अभिलेखावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी या टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ (मोक्का) समाविष्ठ करण्यासाठीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक परभणी यांच्या मार्फत व शिफारशीसह विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड यांच्याकडे सादर केला. प्रस्तावातील अभिलेखांची व कायदेशीर बाबींची पडताळणी करून विशेष पोलिस महानिरीक्षकांनी टोळीप्रमुख व्यकंटी शिंदे व त्याच्या टोळीतील १२ सदस्यांविरुद्धच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे सोपविला आहे. फरार आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

हेही वाचा ...

तीन तलाकप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा

कळमनुरी (जि.हिंगोली) : शहरातील एका विवाहितेचा माहेरावरून दोन लाख रुपयांसाठी छळ करून मारहाण व नवऱ्याकडून तीन तलाक दिल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी मंगळवारी (ता. १४) सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
 जामगव्हाण (ता. औंढा नागनाथ) येथील २१ वर्षीय विवाहितेने कळमनुरी पोलिसात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीनुसार शेवली (ता. जि. जालना) येथील तिचा नवरा दगडू शहा यासीन शहा व त्याच्या कुटुंबामधील सदस्यांनी व्यवसायाकरिता दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी लावून धरली. वडिलांची परिस्थिती पैसे देण्यासारखी नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर विवाहितेचा छळ करून मारहाण करण्यात आली.

हेही वाचा - ‘लायन्स’ देते विस रुपयात नवीदृष्टी

तसेच पती दगडू शहा यासीन शहा याने कुटुंबातील सदस्यांसमोर विवाहितेला तीन वेळा तलाक दिला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात दगडू शहा यासीन शहा, यासीन शहा तुराब शहा, बिस्मिल्ला खैर यासीन शहा, छोटू शहा यासीन शहा, समुया बेगम अन्सार शेख व इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Mokka' against the oppressed Shinde and the gang.