उमरगा तालुक्यात वानरांच्या अतिक्रमणाने शेतकरी घायाळ, पिकांची केली जातेय नासाडी

अविनाश काळे
Thursday, 17 December 2020

निसर्गाच्या व्युहचक्रातून थोडं बाहेर पडून रब्बीची पेरणी करुन पिक बहरात आले असताना आता पिकावर वन्यप्राण्यांची नजर गेली आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : निसर्गाच्या व्युहचक्रातून थोडं बाहेर पडून रब्बीची पेरणी करुन पिक बहरात आले असताना आता पिकावर वन्यप्राण्यांची नजर गेली आहे. हरण, वानरांची संख्या वाढल्याने या प्राण्याकडून कोवळ्या हरभरा पिकाचे शेंडे खुडून खाण्याचा प्रकार दिसत आहे. उमरगा- लोहारा तालुक्यात ७३० हेक्टर राखीव जंगल आहे. तर ६५६ हेक्टर वन सदृश्य परिसर आहे. तालुक्यातील जकेकुर, बेटजवळगा, तलमोड, धाकटी वाडी, जगदाळवाडी, व्हंताळ, समुद्राळ, नाईचाकूर, पेठसांगवी, कोरेगांव, कोरेगांववाडी, वागदरी, त्रिकोळी, तलमोड, हंद्राळ, खेड, अचलेर, मूळज, कानेगाव आदी भागांत हरणांची जवळपास सहा हजार संख्या आहे.

 

 

मोरांची संख्याही तीन हजारांपेक्षा अधिक आहे. वानरांची संख्याही मोठी आहे. मात्र वन्यप्राण्यांसाठी फळझाडे अथवा विशिष्टय खाद्याची वनक्षेत्रात लागवड नसल्याने शेतशिवारात प्राण्यांचा वावर वाढला आहे. मोठ्या मेहनतीने व महागडे बियाणे-खताची पदरमोड केलेल्या शेतकऱ्यांवर वन्यप्राण्याकडून होणाऱ्या नुकसानीचे नवे संकट उभे टाकले आहे. वन्यप्राण्यांची जतन करण्याचा संदेश असल्याने शेतकऱ्यांकडून त्यांची अप्रत्यक्षपणे चारापाण्याची दखल घेतली जाते. मात्र त्यांच्याकडूनच होणारे  कोवळ्या पिकाचे होणारे नुकसान शेतकऱ्यांना पाहावत नाही. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे  शेतकरी मागणी करतात मात्र त्याची दखल घेतली जात नाही.

 

 

कोवळ्या हरभऱ्यावर ताव
यंदा हरभऱ्याचे क्षेत्र अधिक आहे. महागडे बियाणे, खतासाठी शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागली. आता अळ्याचे विघ्न सुरु झाले आहे. त्यात वानरांचे टोळी शिवारात उड्या घेत कोवळ्या पिकात जात आहेत. शेंडे खुडून खाण्याचे चित्र दिसत आहे. मात्र शिवारात वावर वाढल्याने कोवळ्या पिकाचेही नुकसान होत आहे.

 

 

शेतकऱ्यांना निसर्गाचा दगाफटका सहन करत उत्पन्न घेण्यासाठी कसरत करावी लागते. त्यात वन्यप्राण्यांचे अतिक्रमण वाढल्याने पिकाचे नुकसान होत आहे. शेतकरी हा प्राणीमित्र असतो. पण ऐन बहरात आलेल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाकडून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
- सतीश जाधव, शेतकरी, मूळज

 

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monkey, Deers Damaged Crops In Umarga, Lohara Block