नांदेड: उज्जला योजने अंतर्गत 37 हजारपेक्षा अधिक गॅस कनेक्‍शन

शिवचरण वावळे
शुक्रवार, 12 मे 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी उज्ज्वला योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 37 हजार 973 ग्राहकांना डिपॉजीटशिवाय गॅस कनेक्‍शन देण्यात आल्याची माहिती हिंदुस्थान कॉर्पोरेशन लिमिटेडचे अभय औचार यांनी दिली.

नांदेड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी उज्ज्वला योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 37 हजार 973 ग्राहकांना डिपॉजीटशिवाय गॅस कनेक्‍शन देण्यात आल्याची माहिती हिंदुस्थान कॉर्पोरेशन लिमिटेडचे अभय औचार यांनी दिली.

औचार यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारीबाबत माहिती दिली. या योजनेसाठी एकूण 79 हजार 424 ग्राहकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 42 हजार 461 ग्राहक पात्र ठरले. त्यापैकी आतापर्यंत 37 हजार 973 ग्राहकांना गॅस कनेक्‍शन देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील ज्येष्ठ (वयोवृद्ध) महिलेला एक हजार 600 रुपयांचे अर्थसहाय्य आणि विना डिपॉझीट गॅस कनेक्‍शन दिले जाते. भारत, हिंदुस्थान आणि इंडियन ऑईल या कंपन्यांकडून सहकार्य केले जाते. ज्या ग्राहकांना पैसे अदा करणे शक्‍य नाही, अशा ग्राहकांना कर्जसुविधाही उपलब्ध आहे. कंपनीकडून कर्ज देऊन त्यांना कनेक्‍शन दिले जाते आहे. त्यासाठी आवश्‍यक 990 रुपये हे ग्राहकाला मिळणाऱ्या सबसिडीतून प्रत्येक महिना कपात करून घेतले जातात.

सुरक्षित ठिकाणी कनेक्‍शन असावे याची काळजी कंपनीकडून घेतली जात आहे. विशेष करून ग्रामीण भागासाठी ही योजना असून वृक्षतोड कमी व्हावी, स्वयंपाक घरात धूर होऊ नये यासाठी ही योजना तयार केली आहे. नांदेड जिल्ह्यात आणखी ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे कनेक्‍शन केवळ कुटुंबीयांतील वरिष्ठ (वयोवृद्ध) व्यक्तीच्या नावेच घ्यावी लागते. असेच लाभार्थी शहरात असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करावी, त्यांनी मंजुरी दिल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ देता येतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: More than 37 thousand gas connection from Ujjawala Yojana