मॉर्निंग वाक करणारे पोलिसांच्या जाळ्यात...कुठे वााचा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

हिंगोलीत पोलिस व नगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी (ता. २४) सकाळी एनटीसी भागात कारवाईची मोहीम राबवित मॉर्निंग वाक करणाऱ्या २३ नागरिकांना पकडले. त्‍यांना काही वेळ पोलिस ठाण्याच्या आवारात बसवून तंबी देत काही वेळाने सोडून देण्यात आले.

हिंगोली : कोरोनाच्या पाश्वभूमीवर शहरात लॉकडाउन, संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही जण या नियमांचे उल्‍लंघन करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे पोलिस व नगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी (ता. २४) सकाळी एनटीसी भागात कारवाईची मोहीम राबवित मॉर्निंग वाक करणाऱ्या २३ नागरिकांना पकडले. त्‍यांना काही वेळ पोलिस ठाण्याच्या आवारात बसवून तंबी देत काही वेळाने सोडून देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाउन, संचारबंदी तसेच जमावबंदीच्या आदेशाची काटेकोरपणे अमंलबजावणी केली जात आहे. शहरात विनाकारण रस्‍त्यावर फिरणाऱ्या दुचाकी जप्त करून दंडात्‍मक कारवाई केली जात आहे. तसेच तोंडाला मास्‍क न बांधणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या बाबतदेखील कार्यवाही केली जात आहे. 

हेही वाचालॉकडाउनमध्ये चार हजार मजुरांना ‘रोहयो’चा आधार...कोठे वाचा

एनटीसी भागात कारवाईची मोहीम

तरीही काही नागरिक सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पोलिस व नगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी शहरातील एनटीसी भागात कारवाईची मोहीम राबविली. या वेळी मॉर्निंग वाकला आलेल्या २३ जणांना या पथकाने पकडले.

तंबी देऊन सोडण्यात आले 

त्यानंतर सर्वांना शहर पोलिस ठाण्यात आणून मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना तंबी देत नोटीस देऊन सोडण्यात आले. यानंतर मॉर्निंग वॉक करताना दिसल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस उपाधीक्षक रामेश्वर वैजने यांनी दिला. तसेच मास्‍क न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले. या वेळी पोलिस निरीक्षक श्री. सय्यद यांनी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांची नोंद घेतली.

बाळापुरात २१ जणांवर कारवाई

आखाडा बाळापूर : तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या २१ जणांवर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २४) कारवाई करून साडेपाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. संचारबंदीच्या काळामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर आवर घालण्यासाठी पोलिसांनी दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 

सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन

या मोहिमेमध्ये मास्क न लावता फिरणे, दुचाकी वाहनांवर विनाकारण फिरणे यासह इतर कारणांवरून कारवाई केली जात आहे. दरम्यान, येथील भाजी मार्केट सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत सुरू होते. भाजी व किराणा सामान घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या वेळी पोलिसांच्या पथकाने बाजारात फिरून नागरिकांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले. 

येथे क्लिक करातलावात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू...कोठे ते वाचा

पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक

सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, जमादार संजय मार्के, राजू जाधव, गोविंद दळवी, गजानन मुटकुळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी शंकर सूर्यवंशी, शेख अन्वर, रामा सूर्यवंशी आदींनी यात सहभाग घेतला. या वेळी मास्क न घालता बाजारात येणाऱ्या २१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. 

३० दुचाकीस्वारांवर कारवाई

यातून साडेपाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ३० दुचाकीस्वारांवर कारवाई करत त्यांच्याकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस दंडात्मक कारवाई करत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी खिशातील रुमाल तोंडावर बांधण्यास सुरवात केली. तोंडावर मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning walk in the police trap ... where to read Hingoli news