esakal | हिंगोली बाजारपेठेतील बहुतांश व्यवहार सुरू

बोलून बातमी शोधा

hingoli photo

जीवनावश्यक वस्‍तूंच्या दुकानांसह विविध दुकाने दररोज सकाळी आठ ते दुपारी एक या वेळात सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार शुक्रवारपासून बहुतांश दुकाने सुरू झाल्याचे पहावयास मिळाले. तसेच एसटी बसही जिल्हांतर्गत धावत असल्याचे पहावयास मिळाले.

हिंगोली बाजारपेठेतील बहुतांश व्यवहार सुरू
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसाआड सुरू असलेली बाजारपेठ आता नियमित सुरू झाली असून सकाळी आठ ते दुपारी एक या वेळात खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी होत आहे. शुक्रवारपासून (ता. २२) जिल्‍हांतर्गत बससेवादेखील सुरू करण्यात आली आहे. यामुळे अनेकांचे आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी मेअखेरपर्यंत वाढला आहे. परंतु, जीवनावश्यक वस्‍तूंच्या दुकानांसह भाजीपाला, किराणा, स्‍वीटमार्ट, बेकरी, परवानाधारक चिकन, मटण दुकाने, जनरल स्‍टोअर्स, इलेक्ट्रिक दुकाने, हार्डवेअर, ऑटोमोबाइल्‍स, ऑप्टिकल, मोबाइल शॉपी ही दुकाने दररोज सकाळी आठ ते दुपारी एक या वेळात सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी परवानगी दिली आहे.

हेही वाचाधक्कादायक : कोरोनामुळे कामधंदा मिळेना म्हणून मजुराची आत्महत्या

नागरिकांची खरेदीसाठी गर्दी

 त्‍याप्रमाणे सोमवारपासून (ता. १८) बाजारातील दुकाने सुरू झाली आहेत. काही दिवसांनंतर दुकाने सुरू झाल्याने विविध दुकानांवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. पालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या पाच ठिकाणी शहरात बाजार सुरू आहे. दारू विक्रीलादेखील दररोज परवानगी दिली असून परवानाधारक असणाऱ्यांनाच दारूची खरेदी करता येत आहे. 

कपडा मार्केट, सराफा मार्केटला प्रतीक्षा 

जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशाप्रमाणे शुक्रवारपासून सर्वच शासकीय कार्यालयांतील उपस्‍थिती शंभर टक्‍के सुरू झाली आहेत. दरम्यान, बाजारात अद्याप कपडा मार्केट, सराफा मार्केट सुरू झालेले नाही. हीदेखील दुकाने सुरू करावीत, अशी मागणी केली जात आहे.

तब्बल साठ दिवसांनंतर धावली लालपरी

शुक्रवारपासून जिल्‍ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी आगारातून ६० दिवसांनंतर बससेवा सुरू झाली आहे. हिंगोली आगारातून सकाळी आठ वाजता तीन बस सुरू झाल्या आहेत. या बस वसमत, औंढा, सेनगाव, कळमनुरी येथे दिवसभर फेऱ्या मारत आहेत. शुक्रवारी बसमध्ये प्रवाशांची संख्या कमी दिसून आली.

तात्पुरत्या स्वरुपात सेवा सुरू

 एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी घेतले जात आहेत. त्‍यांनादेखील तोंडाला मास्‍क किंवा रुमाल बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासह वसमत, कळमनुरी, औंढा आगारातूनदेखील प्रत्‍येकी तीस बस सोडण्यात आल्या असून तात्‍पुरत्या स्‍वरूपात ही सेवा सुरू करण्यात आल्याचे आगार प्रमुख श्री. चौतमल यांनी सांगितले.

येथे क्लिक करासंतापजजक : प्रेमसंबंधात अडथळा; बारा वर्षीय मुलीला क्रुरतेने संपवले

दहा हजार टन खत विक्रीसाठी उपलब्ध

जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रदेखील सुरू झाले आहे. जिल्‍ह्यात ५५० परवानाधारक दुकाने असून या पैकी ३५० दुकाने नियमित सुरू आहेत. सध्या दहा हजार टन खत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. तर २५ हजार टन खताची जिल्‍ह्याला गरज आहे. दररोज तीन ते साडेतीन हजार पोत्याची विक्री खत विक्री होत आहे. 

कपाशीच्या बॅगची विक्री (ता.२५) मेपर्यंत बंद

तसेच दररोज सोयाबीनच्या पाचशे बॅगांची विक्री होत आहे. कपाशीच्या बॅगची विक्री (ता.२५) मेपर्यंत बंद आहे. बियाणांत मूग, उडीद, ज्‍वारीच्या बॅगांंची खरेदी मात्र कमी असल्याचे गोदावरी ट्रेडर्सचे विक्रेते आनंद निलावार यांनी सांगितले. दरम्‍यान, कृषी विभागाने खताचे नियोजन करून खत पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.