आई, वडिल आणि मुलाच्या हाती पंधरा वर्ष सरपंचपदाची धूरा; उमरगा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत निवडणूक रंगणार

Bori Sarpanch Umarga
Bori Sarpanch Umarga

उमरगा (जि.उस्मानाबाद) : लातूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेले उमरगा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत १९९५ पासून स्वंतत्रपणे अस्तित्वात आली. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या मदने कुटुंबाने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सलग पंधरा वर्षे सरपंच पदाची धूरा सांभाळली. आई, वडिल आणि मुलाने भूकंप पुनर्वसनाचा जटील प्रश्न आणि मूलभूत सुविधा गावात निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान गत पंचवार्षिक निवडणूक सर्वांच्या प्रयत्नातून बिनविरोध आल्यानंतर चालु निवडणूकही बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून सलग दोन टर्म बिनविरोधची परंपरा बोरी ग्रामपंचायतीची यशस्वी होणार आहे.


मातोळा - बोरी गट  ग्रामपंचायत विभक्त झाल्यानंतर १९९५ च्या पहिल्या निवडणुकीत बोरी ग्रामपंचायतीवर काँग्रेसप्रणित आघाडीची सत्ता आली. आरक्षणाची नुकतीच सुरूवात झाली होती. सरपंचपद इतर मागासवर्गीय पुरुषासाठी आरक्षित झाले. या निवडणुकीत सातही जागा काँग्रेसप्रणित आघाडीच्या आल्याने बोरीचे पहिल्या सरपंचपदाचा मान वामनराव मदने यांना मिळाला. सरपंचपद मिळाले पण समस्या जटील होत्या. ३० सप्टेंबर १९९३ च्या भूकंपात घरांची मोठी पडझड झाली. मात्र व्यक्ती दगावला नाही, म्हणून पुनर्वसनाच्या यादीत गावाचा समावेश नव्हता. सरपंच श्री. मदने यांच्या मुलाचे नाव बालक असले तरी ते "बोलके" तरुण होते.

मुलाच्या साहाय्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन गावाच्या पूनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला. २००० च्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर सुगलाबाई वामन मदने यांना सरपंचपदाची संधी मिळाली. २००५ च्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपद सर्वसाधारणसाठी आरक्षित झाल्यानंतर बालक मदने यांना सरपंचपदाचा मान मिळाला. त्यांच्या आघाडीचे सातपैकी चार जागा आल्या होत्या. २०१० च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेची सत्ता आली. २०१५ ची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय यशस्वी झाला आता पुन्हा २०२० ची निवडणूकही बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.



सरपंच ते पोलिस पाटील
गावाच्या राजकारणात सक्रिय राहुन सलग पंधरा वर्ष कुटुंबात सरपंचपदाची संधी मिळालेले बालक मदने यांनी २०१८ मध्ये पोलिस पाटील पदासाठी निघालेल्या जागेसाठी अर्ज केला, त्यात ते उत्तीर्ण झाले.


ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की, आता अवाढव्य खर्च करावा लागतोय. १९९५ च्या निवडणूकीत संपूर्ण आघाडीचा दहा हजार खर्च झाला होता. आता तो लाखो रुपयाच्या घरात जातोय. खर्चाचा अपव्यय टाळण्यासाठी आणि विकासासाठी दुसरी टर्मही बिनविरोध काढण्याचा सर्व पक्ष, व्यक्तींच्या सहकार्याने सुरू आहे. गावात अजुन एसटी पोचली नाही. त्यासाठी सीमेलगत असलेल्या निलंगा तालुक्यातील गावांना जोडरस्त्याचे काम करणे आवश्यक आहे.
- वामनराव मदने, माजी सरपंच, बोरी

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com