esakal | औरंगाबादेत ब्रिटनमधून आलेल्या १३ जणांचा शोध लागेना, महापालिकेने दिली पोलिसांकडे नावांची यादी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

ब्रिटनमध्ये कोरोनाचा धोकादायक विषाणू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ब्रिटनहून आलेल्या प्रत्येक नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे.

औरंगाबादेत ब्रिटनमधून आलेल्या १३ जणांचा शोध लागेना, महापालिकेने दिली पोलिसांकडे नावांची यादी

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : ब्रिटनमध्ये कोरोनाचा धोकादायक विषाणू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ब्रिटनहून आलेल्या प्रत्येक नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. मात्र शहरात आलेल्या १३ नागरिकांचा शोध लागत नसल्याचे समोर आले. आता या नागरिकांचा पासपोर्टवरून शोध घेतला जाणार आहे. १३ नागरिकांच्या नावांची यादी पत्त्यासह पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.


महापालिकेने ब्रिटनहून आलेल्या नागरिकांचे शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वेक्षण सुरु केले आहे. गेल्या एका महिन्यात ब्रिटन येथून ४४ नागरिक शहरात दाखल झाले मात्र यातील ३६ जण महापालिका क्षेत्रातील आहे. ३६ पैकी १३ नागरिकांचा संपर्क होत नसल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी नाव व पत्त्यासह यादी पोलिसांकडे पाठविण्यात आली आहे. पासपोर्ट नंबरवरून त्यांच्या घरांचा पत्ता शोधला जाणार आहे.

दरम्यान शुक्रवारी (ता. २५) चार जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यांचे शनिवारी (ता. २६) अहवाल प्राप्त झाले. हे सर्वजण निगेटिव्ह आहेत. दरम्यान नांदेड येथे गेलेले चार जण व पुणे येथे गेलेला एक जण परत आला आहे. त्यांचे शनिवारी स्वॅब घेण्यात आले. तसेच शहरात असलेल्या आणखी दोघांची कोरोना चाचणी करून घेतली. त्यांचा अहवाल रविवारी (ता. २७) प्राप्त होणार असल्याचे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.


त्या महिलेचा अहवाल सात दिवसानंतर येणार
दरम्यान ब्रिटन येथून आलेली ५७ वर्षीय महिला शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. तिला नवीन कोरोना विषाणूची लागण झाली आहे का? याचा शोध घेण्यासाठी या महिलेच्या लाळेचा नमुना पुणे येथील एनआयव्ही प्रयोग शाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल सात दिवसानंतर प्राप्त होणार आहे, असे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar