आत्महत्येस प्रवृत्त केले; सासूला दोन वर्षे, पतीला एक वर्षे कारावास

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 December 2020

विवाहितेला चारित्र्याच्या संशयावरून व सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासूला दोन वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड व पतीस एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अरविंद एस. वाघमारे यांनी सोमवारी (ता.१४) सुनावली आहे.

माजलगाव (जि.बीड) : विवाहितेला चारित्र्याच्या संशयावरून व सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासूला दोन वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड व पतीस एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अरविंद एस. वाघमारे यांनी सोमवारी (ता.१४) सुनावली आहे. फिर्यादी शिवाजी मारोती सोळंके मुलगी कोमल हिचा विवाह हनुमंत नारायण सिरसट यांच्यासोबत मागील दोन वर्षांपूर्वी झाला होता.

लग्नानंतर एक दिवस मुलगी कोमल हिला भाजलेल्या अवस्थेत तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथे शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी दवाखान्यामध्ये मुलीस भेटण्यास गेले असता काय झाले म्हणून विचारणा करण्यात आली. त्यावेळी सासू शकुंतला नारायण सिरसट ही नेहमी टोचून बोलत असून शिवीगाळ करत होती. त्यामुळे रागाच्या भरात घरात पेटवून घेतल्याचा जबाब तीने दिला होता.

या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी सासू शकुंतला सिरसट, पती हनुमंत सिरसट, सासरा नारायण सिरसट सर्व (रा. मठगल्ली, माजलगाव) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. देवकर यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. न्यायालयात सरकारी वकील रंजित वाघमारे व अॅड. अजय तांदळे यांनी बाजू मांडली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother In Law Two, Husband One Year Get Imprisonment Majalgaon