एमपीएससीच्या परिक्षेत वेळेआधीच फुटल्या प्रश्‍नपत्रिका

महेश गायकवाड
रविवार, 24 मार्च 2019

जालना जिल्ह्यातील अंबड येथील मत्सोदरी शिक्षण संस्थेच्या केंद्रावर वेळेआधीच एमपीएससीच्या प्रश्‍नपत्रिका फोडण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

जालना : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात रविवारी (ता. 24) जिल्हा केंद्रावर अराजपत्रित (गट-ब) पूर्व परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत घेण्यात आली. या परिक्षेत जालना जिल्ह्यातील अंबड येथील मत्सोदरी शिक्षण संस्थेच्या केंद्रावर वेळेआधीच प्रश्‍नपत्रिका फोडण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलिस अधिक्षकांकडे परिक्षार्थींनी केली आहे. 

या प्रकरणी परिक्षा देणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड येथील मत्स्योदरी कॉलेजमध्ये परिक्षेचे केंद्र होते. परिक्षेची वेळ 11 ते 12 होती. दरम्यान पेपरची वेळ झाल्यानंतर पर्यवेक्षकांनी प्रश्‍नपत्रिका वाटण्याआधी परिक्षार्थींना प्रश्‍नपत्रिकेच्या कव्हरवर स्‍वाक्षऱ्या करण्यास सांगितल्या. मात्र, प्रश्‍नपत्रिकेच्या संच अगोदरच फुटल्याचे कृष्णा सवने या उमेदवाराच्या निदर्शनास आले. त्याने स्‍वाक्षरी करण्यास नकार दिला. तसेच शंका उपस्थितीत करून केंद्र प्रमुखांकडे तक्रारही केली. त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सवने यांनी सांगितले. या केंद्रावर दोन ते तीन वर्गात असा प्रकार घडल्याचे परिक्षार्थींनी सांगितले. वर्ष वाया जावू नये म्हणून सर्वांनी परिक्षा दिली आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: before the MPSC examination the question papers were released