परीक्षा घेतली अन्‌ सत्त्वपरीक्षा दिली!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

‘एमएसआरएलएम’च्या भरती प्रक्रियेत दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर

‘एमएसआरएलएम’च्या भरती प्रक्रियेत दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर
लातूर - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात (एमएसआरएलएम) विविध सहा पदांच्या ८९ जागांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी (ता. एक) लेखी परीक्षा घेण्यात आली. मागील काही दिवसांत भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेता या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढण्यापासून परीक्षा घेणे आणि उत्तरपत्रिका तपासून लागलीच निकाल जाहीर करण्याच्या कामात जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दोन दिवस डोळ्याला डोळा लागला नाही. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्याचे नियोजन असताना दुसरा दिवस उजाडण्याआधीच जिल्हा परिषदेने निकाल जाहीर केला. यातून उमेदवारांची परीक्षा घेताना त्यांनीच सत्त्वपरीक्षा दिल्याचा अनुभव घेतला. 

जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) माध्यमातून एमएसआरएलएम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात डाटा एंट्री ऑपरेटर, प्रभाग समन्वयक, शिपाई, लेखापाल, प्रशासन किंवा लेखा सहायक आणि प्रशासन सहायक या सहा पदांच्या ८९ जागांसाठी भरती प्रक्रिया करण्यात आली. सहा पदांसाठी वेगवेगळा अभ्यासक्रम असल्याने त्यांच्या प्रश्नपत्रिकाही स्वतंत्र तयार कराव्या लागणार होत्या. रविवारी परीक्षा असल्याने त्या आधीपासूनच डीआरडीएचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन इनटकर यांनी प्रश्नपत्रिकेची तयारी सुरू केली होती. मोठी संचिका जिवापाड सांभाळात दिवसभराच्या कामातून सवड मिळेल तेव्हा ते प्रश्नपत्रिकेची तयारी करीत होते. शनिवारी (ता. ३०) रात्री त्यांनी काही मोजक्‍या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रश्नपत्रिका तयार करण्यास सुरवात केली. रात्रभर जागून हे काम पूर्ण केले व प्रश्नपत्रिकांच्या प्रिंट आणि झेरॉक्‍स काढून त्या दयानंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर पोचविल्या. सर्व पदांसाठी एकूण साडेबाराशे उमेदवारांनी परीक्षा दिली. दुपारी परीक्षा संपताच लागलीच उत्तरतालिका जाहीर करून उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले. रात्रभर डोळ्यांत तेल घालून उत्तरपत्रिकांची तपासणी केल्यानंतर सोमवारी (ता. दोन) पहाटे निकाल जाहीर करण्यात आला. 

यात उमेदवारनिहाय गुण जाहीर करण्यात आले. पूर्वी लेखी परीक्षा घेतल्यानंतर एक किंवा दोन दिवसांचा खंड देऊन उत्तरपत्रिका तपासणी केली जायची. या भरती प्रक्रियेत दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याने परीक्षा होताच उत्तरपत्रिकांची तपासणी करून दुसरा दिवस उजाडण्याच्या आतच निकाल जाहीर करण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले. परीक्षेच्या निमित्ताने सर्वांचा सत्त्वपरीक्षा दिल्याचा अनुभव आला.

Web Title: MSRLM Exam by ZP recruitment