आता प्या गढूळ पाणी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

शहरातील पाणीटंचाईसोबतच दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक भागांत नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नुकत्याच आलेल्या अहवालावरून समोर आले आहे.

औरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईसोबतच दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक भागांत नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नुकत्याच आलेल्या अहवालावरून समोर आले आहे. मार्च महिन्यात तपासलेल्या ६३५ पाणी नमुन्यांपैकी १५ नमुने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे या वसाहतींमध्ये महापालिकेतर्फे क्‍लोरिन पावडर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्याचबरोबर दूषित पाण्याच्या तक्रारीदेखील दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यानुसार जलवाहिनीच्या दुरुस्त्या सुरू असल्या तरी अद्याप सुधारणा झालेली नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विविध वसाहतींमधील नळांचे पाणी नमुने घेऊन तपासणीसाठी प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळेत दिले जातात. मार्च महिन्यात शहरातून ६३५ पाणी नमुने तपासणीसाठी आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील पंधरा नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे. फारोळा येथे महापालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा आहे. त्या ठिकाणी देखील पाण्याचे नमुने घेतले जातात; मात्र पुढे जलवाहिनीच्या गळत्यांमुळे काही ठिकाणी हे पाणी दूषित होते. शहरांतर्गत जलवाहिनीच्या मोठ्या गळत्या असल्याने दूषित पाण्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून अशा भागातील नागरिकांना पाण्यात मिसळण्यासाठी क्‍लोरिन पावडरचा पुरवठा केला जातो, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. 

या भागात दूषित पाणी 
सहजीवन कॉलनी, एसटी कॉलनी, हडको एन- १२, रशीदपुरा, जयभीमनगर, मज्जीदगल्ली, समतानगर, गोकुळवाडी या भागात दूषित पाणी आढळून आले आहे.

प्रभाग एकमधून सर्वाधिक नमुने
प्रभाग क्रमांक एकमधून सर्वाधिक २२४ नमुने घेण्यात आले होते. त्यातील अकरा नमुने दूषित आढळले. त्यापाठोपाठ प्रभाग तीनमधून १८५ आणि प्रभाग दोनमधूनही १७५ नमुने घेतले. हे सर्व नमुने निर्दोष आढळले. प्रभाग चारमधून घेण्यात आलेल्या आठ नमुन्यांपैकी चार नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे. प्रभाग पाचमधून ७ नमुने घेण्यात आले. हे सर्व नमुने निर्दोष आढळले असल्याचे अहवाल नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातूनही ३६ पाणी नमुने घेतले होते. हे सर्व नमुने शुद्ध असल्याचे समोर आले आहे. 

Web Title: muddy water in aurangabad