जालन्याच्या मराठीला बहुभाषिक टच

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना -  जालना नगरी जशी उद्योग- बियाणे नगरी आहे तशी ती विविध भाषा अन् बोलीचा व्यवहार करणारे अनोखे शहर आहे. मराठीसह पंधरा भाषेत व्यवहार करणारी माणसे या नगरीत गुण्यागोविंदाने नांदतात हे वेगळेपण आहे. जनकपूर नगरी किंवा महानुभाव साहित्य परंपरेत 'हिरवळी' हे नाव धारण करणारे शहरवजा खेडे म्हणजे जालना.

जुना व नवीन जालना अशी साधारण दोन भागांत विभागणी म्हणता येईल. यावरून भाषा व्यवहाराची लकब आणि अदा निराळी निराळीच अनुभवायला येते. जुना जालना भागात मराठी, हिंदी, उर्दू, बंजारा, अहिराणी बोली यासह इतर भाषेत व्यवहार करणारी माणसेपण प्रामुख्याने आहेत. याउलट नवीन जालना भागात मराठी भाषेच्या समवेत संमिश्र विविध भाषेत व्यवहार आढळून येतो. गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी, तेलुगू ,कर्नाटकी तमीळ, इंग्रजी आदी भाषेत व्यवहार होत असतो. शहरातील बडी सडक, सिंधी बाजार, दाणा बाजार, सराफा बाजार, फूल बाजार या भागात विविध भाषा संमिश्रपणे बोलण्याची पद्धत आहे.

भाषेच्या या व्यवहारात गमतिशीर शब्दही आहेत. व्यवहार करताना कुठलीच भाषा परिपूर्ण बोलली जात नाही हे जालनी बोलीभाषेचे वेगळेपण सांगता येते. जसे 'आदम्या कितीक है, ' कायकू टाईम घालवतूया', 'उदरके रस्तेपासून ' असे अनेक शब्दांची सरमिसळ करून बोलण्याची जालनेकराची शैली मात्र निराळीच म्हणावी लागेल. दैनंदिन रोजचे व्यवहार असो की बाजारहाट भाषेची सरमिसळ करून बोलणार नाही, तो जालनेकर निराळाच.

जुना जालना परिसरातील कचेरी रोड, गणपती गल्ली, भाजी बाजार, माळीपुरा, दुःखीनगर, अंबड चौफुली आदी भागांत मराठी भाषेत हिंदी भाषेचा शब्द बदलून बोलणारे जालनेकरच. यात शादी मे लगन, खाणे में भोजन, बारात में आदम्या, तेरेकू, मेरेकू, कायकू, इधरकू जाणे का असे शब्दप्रयोग सतत येतात. शहरातील काही वसाहतीत लोकांच्या बोलण्यात हमखास येणारा शब्द म्हणजे ' कायकू कटकट कररा', कुठून अवधान आलं, धकून घ्याना, आताच उजाडलं, असे एक ना अनेक शब्द मराठीसह हिंदीत सहजपणे येतात. शहरातील औद्योगिक वसाहत, चंदनझिरा,नागेवाडी या भागांत इतर राज्यांतील विविध ठिकाणांहून कामगार म्हणून काम करणारे अधिक आहेत. या भागात हिंदी -मराठी भाषा संमिश्र बोलीचा प्रभाव अधिक आहे. यासह उस्मानाबाद, लातूर, जळगाव, नांदेड अशा जिल्ह्यांतील स्थानिकांची भाषाच गमतिशीर बोलली जाते.

बोली भाषाची गमतीदार उदाहरणे

  • रोडा बहुत खराब है
  • गली क्या लाईटा गया
  • दवाखाने में औषध घेनेकु
  • आईतवारकु सुटी है
  • परीक्षा क्या के टाईम मै
  •  राजकारणा में पॉसिटिक्स घुसा

भाषा ही विचार अन् व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. शहरात विविध भाषेतून व्यवहार चालतो; पण यात मराठी भाषेचा गोडवा, आपुलकी आणि आस्था हरवली असल्याचे दिसून येते. इंग्रजी शाळेचा वाढता प्रभाव मराठी भाषेवर वर्चस्व प्रस्थापित करतो .मराठी राजभाषादिनी मराठी भाषेचा व्यवहार वाढला पाहिजे. 
- प्रा.बी.वाय. कुलकर्णी 
ज्येष्ठ विचारवंत, जालना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com