लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या तरुणीवर जालन्यात बलात्कार, युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

उमेश वाघमारे
Saturday, 28 November 2020

सोशल मीडियावर मैत्री केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून मुंबई येथील तरुणीवर जालन्यात युवकाने बलात्कार केला. अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची भिती दाखवीत ब्लॅकमेलही केले. शिवाय पीडित तरुणीकडून तब्बल एक लाख १९ हजार ९०० रुपये उकळले.

जालना : सोशल मीडियावर मैत्री केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून मुंबई येथील तरुणीवर जालन्यात युवकाने बलात्कार केला. अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची भिती दाखवीत ब्लॅकमेलही केले. शिवाय पीडित तरुणीकडून तब्बल एक लाख १९ हजार ९०० रुपये उकळले. या प्रकरणी संशयिताला सदर बाजार पोलिसांनी गुरूवारी (ता.२६) रात्री ताब्यात घेतले आहे. मुंबई येथील एका तरुणीशी जालना शहरातील हिंदनगर परिसरातील संशयित नासीर अफसर खान याची सोशल मिडिया इंस्टाग्रामवर मैत्री झाली. त्यानंतर नासीरला भेटण्यासाठी जालना येथे आली. तेव्हा नासीर खान याने लग्नाचे आमिष दाखवून या तरुणीवर जिंदल मार्केटमधील एक दुकानात बलात्कार केला. अश्‍लील छायाचित्रेही काढले.

वाढदिवसाचे कारण देत नासीर खान याने पुन्हा पिडीत तरुणीला जालना येथे बोलावून घेतले. शहरातील एका लॉजवर तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. तसेच वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून मोठी रक्कम लाटली. नासीर खान याने या पिडीत तरुणीकडून नोकरी व इतर कारणे देत जवळपास एक लाख १९ हजार ९०० रुपये लाटले. मात्र, तो एवढ्यावर न थांबता पिडीत तरुणीकडे नासीर सतत पैशांचा तगादा करू लागला.तसेच पैसे न दिल्यास तुझे अश्‍लील छायाचित्र नातेवाइकांना पाठविण्याची धमकी ही तरुणीला दिली. त्यानंतर आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने नातेवाइकांसह मुंबई येथील ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ओशिवरा पोलिसांना हा गुन्हा जालना येथील सदर बाजार पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. त्यानंतर ता. १३ नोव्हेंबर रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिस निरीक्षक संजय देशमुख व त्यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक मंजूषा सानप, कर्मचारी समाधान तेलंग्रे, सुधीर वाघमारे, फुलचंद गव्हाणे, योगेश पठाडे यांच्या पथकाने संशयित नासीर खान याला गुरूवारी (ता.२६) रात्री अटक केली. त्याला शुक्रवारी (ता.२७) न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्याला ता.३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Girl Molestated In Jalna, Police Arrested Youth