मुंडे बहिण भावामध्ये हिंगोलीत कलगीतुरा

मुंडे बहिण भावामध्ये हिंगोलीत कलगीतुरा
मुंडे बहिण भावामध्ये हिंगोलीत कलगीतुरा

हिंगोली, ता. - ""भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नये, स्वतःच्या तोंडाला लागलेले भ्रष्टाचाराचे खरकटे आधी पुसावे, मगच दुसऱ्यावर आरोप करावे,'' अशी टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी व कॉंग्रेसवर केली आहे. तर ""तुम्ही खात रहा, मी तुम्हाला सांभाळतो अशी मुख्यमंत्र्यांची सध्याची स्थिती असल्याची,'' टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. हिंगोली नगरपालिका निवडणुकीसाठी काल या दोन्ही नेत्यांच्या सभा झाल्या.

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महात्मा गांधी चौकात आयोजित सभेत पंकजा मुंडे म्हणाल्या,""अनेक वर्षांपासून वीज, पाणी, नाल्यांचा प्रश्‍न कायम आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने नागरिकांना विकसित होऊ दिले नाही. विकास कामे न करता आपली तिजोरी भरणाऱ्यांनी शहरे बकाल केली. कोट्यवधी रुपये खर्चून विकास कामे न करता स्वतःची तिजोरी भरण्याचे काम विरोधकांनी केले आहे. निवडणुका आल्यानंतर जातीचे राजकारण केले जाते. मात्र, जाती पाण्यासारख्या एकत्र आल्या पाहिजेत. कोणी कितीही काठी मारली तरी त्याची विभागणी होता कामा नये. जातीचे राजकारण पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही''

""केंद्र शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर काळा पैसा घेणाऱ्यांचे नुकसान झाले. ज्यांनी लोकांच्या तोंडचा घास काढून खाल्ला त्यांचे नुकसान झाले आहे. आता बॅंकेत, एटीएमवर रांगा दिसत असल्याची ओरड करणाऱ्यांना त्यांच्या सरकारच्या काळात रॉकेलसाठी, शिधापत्रिकेवरील धान्यासाठी असलेल्या रांगा दिसल्या नाही का?''असा सवाल पंकजा मुंडे यांनी यावेळी केला. आगामी काळात 2019 पर्यंत 32 हजार किलोमीटर अंतराचे रस्ते केले जातील. तर 2020 पर्यंत एकही जण घरकुलापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

भ्रष्टाचार सिध्द करता आला नाही - धनंजय मुंडे
आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी दोन वर्षापासून सत्ता असतांना आमच्यावरील आरोप का सिध्द केले नाहीत, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हिंगोली पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जगजित खुराणा व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इंदिरा गांधी चौकात आयोजित सभेत केला. यावेळी धनंजय मुंडे बोलताना म्हणाले,""आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी सत्तेत येऊन दोन वर्षातच तीन हजार 725 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. दोन वर्षातच अकरा मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आले आहेत. तुम्ही खात रहा, मी सांभाळतो अशी स्थिती मुख्यमंत्र्यांची झाली आहे.'
केंद्रात सत्ता आल्यानंतर शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मात्र, पंधरा हजार रुपये देखील खात्यावर जमा झाले नाहीत. आता तर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने कष्ट करून बॅंकेत बचत केलेले पैसेही काढण्याचे वांदे झाले आहेत. ही देशातील सव्वाशे कोटी जनतेची फसवणूक असल्याचा,'' असा आरोप त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादीच्या काळात मंजूर झालेली भूमिगत गटार योजनेचे श्रेय भाजपाकडून घेतले जात असल्याची टिकाही त्यांनी केली. आम्ही मंजूर केलेल्या योजनेच्या भुमीपुजनासाठी मुख्यमंत्र्यांना यावे लागते, यापेक्षा मोठे दुर्देव नसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com