स्वाध्याय परिवारातर्फे मनपाला फाॅगिंग संयंत्राची भेट   

प्रमोद चौधरी
Tuesday, 14 April 2020

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वाध्याय परिवाराने नांदेड वाघाळा महापालिकेला सोमवारी (ता. १३ एप्रिल २०२०) शहर निर्जंतुकीकरणासाठी फॉगिंग संयंत्राची भेट दिली. स्वाध्याय परिवारातर्फे दिली जाणारी ही भेट कोरोना संक्रमणासारख्या या विपरीत काळात केवळ सामाजिक भान व नैतिक कर्तव्य म्हणून समाजाला दिलेले एक छोटेसे योगदान आहे.

नांदेड : सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणूरूपी महामारी आपला पंजा भारतभरात घट्ट आवळत असून त्याला भारत सर्वशक्तीनिशी एकजुटीने लढा देत आहे. जेव्हा जेव्हा अशी कुठली आपत्ती समाजावर आली आहे तेव्हा तेव्हा स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) आणि त्यांची सुपुत्री धनश्री तळवलकर (दीदी) यांनी नेहमीच सर्वांचीच चिंता केली आहे, काळजी केली आहे. 

लॉकडाऊनच्या काळात व्यक्तींनी घराबाहेर पडू नये आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे. ज्यामुळे या विषाणू संक्रमणावर मात करणे शक्य होईल. या अशा उपायांबरोबरच सद्यस्थितीत अनेक विदेशांत फॉगिंग मशिन्सद्वारे विशेष जंतुनाशकांची फवारणी करून रस्ते, वस्त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. स्वाध्याय परिवारातर्फे अशा प्रकारची विशेष पाच फॉगिंग मशिन्स महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाला नुकतीच मुंबई येथे प्रदान करण्यात आली आहे. ज्यांचा मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात निर्जंतुकीकरणासाठी वापर करण्यात येत आहे. 

हेही वाचा - लॉकडाऊन : रोजगाराविना थांबला चुलीचा धूर

निर्जंतुकीकरणासाठी ठरणार वरदान
असेच एक फॉगिंग मशीन सोमवारी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेला प्रदान करण्यात आली आहे. या फॉगिंग मशीनची विशेषता अशी आहे की,  हे मशीन एकावेळी ६०० लिटर पेक्षा जास्त प्रवाही द्रव्य साठवू शकते.  सतत दीड तास फवारणी करू शकते.  तसेच जवळपास ३० चौरस मीटर इतके क्षेत्र एकावेळी कव्हर करू शकते. स्वाध्याय परिवाराने आरोग्य विभागाला दिलेली ही विशेष फॉगिंग मशिन्स निर्जंतुकीकरणासाठी वरदानरूप ठरतील यात शंका नाही.  

हे देखील वाचाच - भन्नाटच : आई-वडिलांवरील लेखांचे होणार संपादन, कसे? ते वाचाच

कुठे कुठे केली मदत
स्वाध्याय परिवाराने वैद्यकीय क्षेत्रात जिवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्या अनेकांसाठी मास्क्स (masks) याआधीच आरोग्य विभागाला प्रदान केले होते. तसेच मुंबईप्रमाणे महाराष्ट्रात नाशिक व अहमदनगर येथे पण अशा प्रकारची फॉगिंग मशिन्स स्वाध्याय परिवाराकडून देण्यात येणार आहे तर गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा, राजकोट, भावनगर, सुरेंद्रनगर, भुज या शहरात अशा अनेक मशिन्स यापूर्वीच दिलेल्या आहेत. त्याबरोबरच मास्क, हँडग्लोव्हस तसेच सॅनिटायझर असे एकत्र असणारे ३० हजार किट्स आजपर्यंत स्वाध्याय परिवाराने दिलेले आहेत. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम स्वाध्याय परिवारातर्फे राबविला जात आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation Complimentry of Fogging Plant Nanded News