महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

लातूर - जिल्हा परिषदेत कॉंग्रेसशी आघाडी केल्याने स्वपक्षातील इच्छुक कार्यकर्ते अडचणीत आल्याचा अनुभव राष्ट्रवादी कॉंग्रेसला आला. त्यांतर महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी न करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसने 18 प्रभागांतील 70 जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

लातूर - जिल्हा परिषदेत कॉंग्रेसशी आघाडी केल्याने स्वपक्षातील इच्छुक कार्यकर्ते अडचणीत आल्याचा अनुभव राष्ट्रवादी कॉंग्रेसला आला. त्यांतर महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी न करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसने 18 प्रभागांतील 70 जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहरातील पारिजात मंगल कार्यालयात गुरुवारी (ता. दोन) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची पालिकेच्या निवडणुकीशी संबंधित मते जाणून घेण्यात आली. पालिकेत पक्षाला विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करण्याचे ठरले. अनेक कार्यकर्त्यांनी पालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा आग्रह धरला. महापालिकेच्या मागील निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांतच प्रमुख लढत झाली होती. त्यात राष्ट्रवादीला 13 जागा मिळाल्या होत्या. दहा ते 12 वॉर्डांतील उमेदवारांचा विजय थोडक्‍यात हुकला होता. शहरात राष्ट्रवादीची शक्ती असून, मतदारांचा पाठिंबा वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीने प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत नागरिकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे कॉंग्रेसशी आघाडी केल्यास राष्ट्रवादीचे नुकसान होऊ शकते, असा सूर कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादीला कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या वाटतात. पालिकेच्या 18 प्रभागांतील 70 जागांवर सक्षम उमेदवार देऊन सर्वच जागा स्वबळावर लढविल्या जातील. कॉंग्रेसने आघाडीसाठी प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्न नाही. कॉंग्रेस व भाजप यांच्याशिवाय इतर समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे, असे श्री. सावे यांनी जाहीर केले. 

या प्रसंगी शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, नगरसेवक राजा मनियार, राजेंद्र इंद्राळे, शैलेश स्वामी, विनोद रणसुभे, राहुल माकणीकर, नगरसेविका रेहाना बासले, माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, संजय शेट्टे, संजय बनसोडे, मुर्तुजा खान, रेखा कदम, संजय सोनकांबळे, पप्पू कुलकर्णी, सय्यद इब्राहिम, इरफान शेख, धुळाप्पा अरबळे, मकरान शेख, विक्रम कदम, डॉ. विभाकर मोठे, फारुख तांबोळी, सय्यद अब्दुल, विजय बनसोडे, विशाल विहिरे, लाला सुरवसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: The municipal elections on its own NCP fight