एका दिवसासाठी चौघांचे सदस्यत्व रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

औरंगाबाद - स्थायी समितीचे मावळते सभापती गजानन बारवाल यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याला विरोध करणाऱ्या त्यांच्याच शहर विकास आघाडीच्या चार नगरसेवकांचे सदस्यत्व रविवारी (ता.२९) एका दिवसासाठी रद्द करण्यात आले. सदस्यांनी असंसदीय शब्दप्रयोग करीत सभापतींना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. शिवाय महापौर व सभापतींच्या अंगावर अंदाजपत्रकाच्या पुस्तिका भिरकावत घोषणाबाजीही केली. 

स्थायी समितीच्या निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची तीन दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली. यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते तथा मावळते सभापती बारवाल यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी पुन्हा स्वतःच्याच नावाची शिफारस केली होती. त्यावरून शहर विकास आघाडीत फूट पडली. महापालिकेचे २०१७-१८ चे वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यासाठी रविवारी विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी बारवाल यांनी शहर विकास आघाडीतील सदस्यांचा विश्वासघात केला, असा आरोप करीत त्यांना पुन्हा अंदाजपत्रक सादर करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी नगरसेवक कैलास गायकवाड, गोकुळ मलके यांनी लावून धरली; परंतु महापौर नंदकुमार घोडेले यांनी नियमाप्रमाणे तसे करता येत नाही, ही अर्थसंकल्पीय विशेष सभा असल्याचे सांगत बारवाल यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यासाठी पाचारण केले. आघाडीचे नगरसेवक गायकवाड, मलके, राहुल सोनवणे आणि रमेश जायभाये यांनी त्यांना जोरदार विरोध करीत घोषणाबाजी केली. तसेच महापौर हे पक्षपात करीत असल्याचा आरोप करून या नगरसेवकांनी अंदाजपत्रकाच्या प्रती महापौर व सभापतींच्या अंगावर भिरकावत निषेध व्यक्‍त केला. यावरून त्या चार नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करण्यात आले.

प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत. उपायुक्त रवींद्र निकम बुधवारपर्यंत (ता. दोन) अहवाल सादर करतील. यानंतर अहवालाच्या आधारे त्या नगरसेवकांवर नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल. सभागृहात बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही. 
- नंदकुमार घोडेले, महापौर 

Web Title: municipal meeting 4 corporator Membership cancel for one day