महापालिकेच्या सहा जेटिंगची आरटीओने रोखली परवानगी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

औरंगाबाद - महापालिकेने खरेदी केलेल्या जेटिंग मशीन अतांत्रिक पद्धतीने तयार झाल्याचा संशय आरटीओ कार्यालयाने व्यक्त केला असून, नव्याने आलेल्या सहा जेटिंग मशीनची नोंदणी (रजिस्ट्रेशन) आरटीओ कार्यालयाने रोखून धरले आहे.

औरंगाबाद - महापालिकेने खरेदी केलेल्या जेटिंग मशीन अतांत्रिक पद्धतीने तयार झाल्याचा संशय आरटीओ कार्यालयाने व्यक्त केला असून, नव्याने आलेल्या सहा जेटिंग मशीनची नोंदणी (रजिस्ट्रेशन) आरटीओ कार्यालयाने रोखून धरले आहे.

महापालिकेकडे अवघ्या तीन जेटिंग मशीन असल्याने तब्बल दोन वर्षांपूर्वी शहरातील सतीश मोटार्सकडून टाटा ४०७ ची चेसिस खरेदी करण्यात आली. त्यानंतर या वाहनांवर जेटिंग यंत्रणा बसविण्यासाठी अहमदाबाद (गुजरात) येथे पाठविण्यात आले होते. महापालिकेने घेतलेल्या वाहनांवर गुजरातच्या कंपनीने दोन हजार लिटर क्षमतेच्या टाक्‍या बसवून जेटिंगची यंत्रणा तयार केली आहे; मात्र महापालिकेकडे पैसे नसल्याने तब्बल दोन वर्षांपासून सहा जेटिंग मशीन अहमदाबादमध्ये अडकून पडल्या होत्या. पैशांची व्यवस्था केल्यानंतर या जेटिंग मशीन अखेर बुधवारी (ता. २३) महापालिकेत दाखल झाल्या. 

आरटीओने रोखली परवानगी
महापालिकेने घेतलेल्या जेटिंग मशीन अतांत्रिक असल्याचे प्रथमदर्शनी वाटल्याने आरटीओ कार्यालयाने नोंदणी रोखून धरली आहे. ज्या कंपनीने जेटिंग यंत्रणा बसविली, त्यांनी अभियांत्रिकीचे ट्रेड सर्टिफिकेट सादर केले नसल्याचे आरटीओ कार्यालयाचे म्हणणे आहे. कुठल्याही वाहनावर टॅंकर, जेटिंग अथवा अन्य काहीही बसवायचे असल्यास त्याच्या डिझाईनची परवानगी घेणे बंधनकारक असते. राज्य व केंद्र शासनाच्या अधिकृत एजन्सीला असे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार असतो. तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने वाहनांवरील यंत्रणेची बांधणी असल्याचे तपासून ही यंत्रणा प्रमाणपत्र देत असते. हे प्रमाणपत्र संबंधित कंपनीने सादर केले नाही. त्यामुळे सहाही वाहनांची नोंदणी रोखण्यात आली आहे. खरे तर तांत्रिकदृष्ट्या योग्यता तपासून महापालिकेने कुठल्याही कंपनीला काम देणे आवश्‍यक होते; मात्र प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या नियम, अटी मंजूर झाल्यानंतर महापालिका अन्य बाबींकडे दुर्लक्ष करते, हे यातून पुन्हा स्पष्ट होत आहे.

Web Title: municipal rto jetting permission