ऐतिहासिक दरवाजांसाठी महापालिकेने उघडले तिजोरीचे "द्वार'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

पाच गेटच्या डागडुजीसाठी काढली 47 लाखांची निविदा; प्राचीन वारसा जपणार
औरंगाबाद - येथील ऐतिहासिक दरवाजांची मोठी दुरवस्था झाली. यावर "सकाळ'ने "दरवाजांचा पंचनामा' या वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत महापालिकेने या पाच दरवाजांच्या डागडुजीसाठी 47 लाख रुपयांच्या कामांची निविदा काढली आहे.

पाच गेटच्या डागडुजीसाठी काढली 47 लाखांची निविदा; प्राचीन वारसा जपणार
औरंगाबाद - येथील ऐतिहासिक दरवाजांची मोठी दुरवस्था झाली. यावर "सकाळ'ने "दरवाजांचा पंचनामा' या वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत महापालिकेने या पाच दरवाजांच्या डागडुजीसाठी 47 लाख रुपयांच्या कामांची निविदा काढली आहे.

दरवाजांचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. शहरात सध्या 14 ऐतिहासिक दरवाजे आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बहुतांश दरवाजांची मोठी दुरवस्था झाली आहे. काही दरवाजांचा वापर स्वच्छतागृहांसारखा केला जातो; तर काही ठिकाणी अतिक्रमण करून त्यात व्यवसायही थाटल्या गेला आहे. काहींची पडझड होत आहे. या सर्वांवर "सकाळ'ने आपल्या वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला होता. त्यामुळे महापालिकेने या दरवाजांची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने शहरातील पाच दरवाजांची दुरुस्ती केली जाणार आहे. यात नौबत दरवाजा, जाफर गेट, काळा दरवाजा, पैठण गेट, बारापुल्ला या दरवाजांचा समावेश आहे. त्यांच्या डागडुजीसाठी महापालिकेने निविदा काढली आहे.

प्राधान्यक्रमाचा निकष काय ?
महापालिकेने ज्या पाच दरवाजांच्या डागडुजीचा निर्णय घेतला, त्याच दरवाजांचे काही वर्षांपूर्वी संवर्धन करण्यात आले होते. दरम्यान, आता शहरातील बहुतांश दरवाजांची परिस्थिती बिकट आहे. पण, संवर्धन केलेल्या याच दरवाजांचे काम प्राधान्याने करण्याचा आटापिटा कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, हेरिटेज समितीच्या बैठकीत याबाबत चकार शब्द काढण्यात आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे डागडुजीचा प्राधान्यक्रम कोणत्या निकषावर ठरवला गेला, हा चिंतनाचा विषय बनला आहे.

मेहमूद दरवाजा पाडणार ?
पाणचक्कीलगत असलेल्या मेहमूद दरवाजाची मोठी दुरवस्था झाली आहे. या दरवाजाचे छत आणि भिंत कधीही कोसळू शकते. असे असताना डागडुजी झालेल्या दरवाजांचेच काम करण्यात येणार आहे. त्यामुळे "खास गेट'प्रमाणे हाही दरवाजा पाडण्याचा विचार महापालिका करत नाही ना, अशी चिंता इतिहासप्रेमींना सतावत आहे.

अशी आहे तरतूद (आकडे लाखांमध्ये)
1. नौबत दरवाजा - 17,22,347
2. जाफर गेट - 4,42,862
3. काळा दरवाजा - 9,76,818
4. पैठण गेट - 8,97,339
5. बारापुल्ला गेट - 6,76,685
एकूण रक्कम - 47,16,051

Web Title: municipal safe open for historical door