ऐकावे ते नवलच... महापालिका मोजणार डास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

डेंगीचे चार बळी गेल्यानंतर आरोग्य विभागाला आली जाग 

औरंगाबाद : डेंगीमुळे शहरात चौघांचे बळी गेल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली आहे. ज्या भागात डेंगीचे बळी गेले तेथील डास मोजण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. डासांची घनता इन्सेक्‍ट कलेक्‍ट या यंत्राद्वारे मोजली जाणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी गुरुवारी (ता. 26) सांगितले. 

शहरात डेंगीसह साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांत डेंगीमुळे चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बळींची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागासह शासकीय यंत्रणादेखील कामाला लागली आहे. अतिजोखमीच्या भागात फॉगिंग, ऍबेट औषधी टाकणे, कोरडा दिवस पाळणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. आता अतिजोखमीच्या दहा भागांत विशेष सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे; तसेच ज्या भागात डेंगीमुळे बळी गेले तिथे डेंगीच्या डासांचे प्रमाण किती आहे, याचे मोजमाप केले जाणार आहे. इन्सेक्‍ट कलेक्‍ट यंत्राद्वारे डासांची घनता मोजली जाते. या भागातील 500 घरांची तपासणीही केली जाईल. 50 आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जाणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 
 
शाळा, मॉल्स, कार्यालयांना देणार पत्र 
शहरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, व्यापारी संकुले, मॉलला महापालिकेतर्फे पत्र दिले जाणार आहे. त्यात कोरडा दिवस पाळणे, साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना राबविणे व तपासणी करून घेण्याची सूचना केली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipality count mosquitoes