esakal | आष्टीत देवस्थान जमिनीच्या अपहार प्रकरणी मुन्ना रत्नपारखीला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

मुन्ना उर्फ मनोज दत्तोपंत रत्नपारखे

आष्टीत देवस्थान जमिनीच्या अपहार प्रकरणी मुन्ना रत्नपारखीला अटक

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि.बीड) - देवस्थान इनाम जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून शंभर एकर जमिनीच्या अपहार प्रकरणी मध्यस्थ मुन्ना उर्फ मनोज दत्तोपंत रत्नपारखे (वय 52, रा. मुर्शदपूर, आष्टी) याला आष्टी (Ashti) पोलिसांनी अटक केली असून, सोमवारी (ता. 20) न्यायालयासमोर उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सातबारा (Beed) अभिलेखात फेरबदल करून देवस्थान जमिनीचा अपहार केल्याचा हा प्रकार असून, यामुळे तालुक्यात (Crime In Beed) खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील रूई नालकोल येथे संत शेख महंमद बाबा दर्ग्याची 75, 76, 77 81/अ, 81/आ सर्व्हे क्रमांकामध्ये शंभर एकर जमीन आहे.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार, पीडितेचा मृत्यू

देवस्थानच्या सेवेसाठी शेख बाबुलाल शेख महंमद, शेख चाँद पिता शेख महंमद, शेख हजरत शेख महंमद, शेख रशीद शेख अहमद, शेख निजाम शेख अहमद, शेख दस्तगीर शेख महंमद, शेख गुलाब शेख अहमद हे सर्वजण वाडवडिलांपासून या जमिनीची कब्जे वहिवाट करीत आहेत. शेख महंमद दर्गा ही इनाम जमीन असून, वर्ष 1960-61 पासूनचे सातबारा अभिलेखात पण देवस्थान इनाम असे स्पष्ट नमूद आहे व वहिवाटदार म्हणून महंमद रतन भाई अशी नोंद आहे. वरील सर्वजण हे वारसदार आहेत. मात्र, या जमिनीवर डोळा ठेवून गोपीनाथ पांडुरंग बोडखे, शेख मुस्ताक बादशाह पानसरे, आजिनाथ त्र्यंबक बोडखे या तीन प्राध्यापकांसह मुख्याध्यापक सुरेश गहिनीनाथ बोडखे, सरपंच संजय भाऊसाहेब नालकोल, शरद नानाभाऊ पवार यांचा सदरील देवस्थान जमिनीशी कसल्याची प्रकारचा संबंध नसतांना राजकीय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून व बनावट कागदपत्रे तयार करून शेख महमंद महाराज दर्गा देवस्थानचे नाव सातबारा अभिलेखातील कब्जेदार रकाण्यातून कमी केले. इतर हक्कातील अर्चकाचे नावही कमी करून स्वतःचे नाव प्रतिबंधीत मालक म्हणून लावले. सातबारा अभिलेखात बेकायदेशीर फेरबदल करून देवस्थानच्या शंभर एकर जमिनीचा बनावट कागदपत्रा आधारे अपहार करत बळकावली. हा सर्व प्रकार वर्ष 2020 मध्ये लक्षात आल्यानंतर वारसदारांनी तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार व तक्रारी अर्ज केले.

हेही वाचा: औरंगाबाद : यंदा विद्यार्थ्यांना मिळणार दोन गणवेश

मात्र, यश न आल्याने त्यांनी वक्फ बोर्ड व पोलिस विभागाला अर्ज दिले. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी चालू असतांना जिल्हाधिकारी (भूसुधार) यांच्याविरोधात अपीलही दाखल केले. हे प्रकरण चालू असतांना वारसदारांच्या वतीने 100 रूपये बॉण्डवर भूसुधार अधिकारी बीड यांच्याकडे दाखल केलेले संमतीपत्र पूर्णतः खोटे व त्यावरील स्वाक्षरा खोट्या असल्याचे लक्षात आले. या संदर्भात शेख दस्तगीर महंमद यांनी पोलिसांत ता. तीन सप्टेंबर 2021 रोजी वरील सर्व लोकांविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणी अजिनाथ बोडखे, सुरेश बोडखे, गोपीनाथ बोडखे (सर्व रा.आनंदवाडी), रुईनालकोल गावचा सरपंच संजय नालकोल, शरद नानाभाऊ पवार (दोघे रा. रूई नालकोल) यांना अटक केली आहे. तर प्रा. शेख मुस्ताक बादशाह पानसरे हा फरारी आहे. या प्रकरणात महसूल दप्तरी अधिका-यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे तयार करणारा मुन्ना ऊर्फ मनोज दत्तोपंत रत्नपारखे हा व्यक्ती असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. यानंतर पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी रविवारी (ता. 19) सायंकाळी पाचच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. सोमवारी (ता. 20) आष्टी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला ता. 23 पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

loading image
go to top