आईपुढेच मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

दोनवेळा पुरला मृतदेह
गणेश अलंकार याचा खून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी चुलता भागतआप्पा अलंकार व सचिन अलंकार यांनी गणेशचा मृतदेह गावाजवळील रामभाऊ अंभोरे यांच्या शेताजवळ पुरून टाकले. त्यानंतर रात्री पुन्हा गणेशचा मृतदेह बाहेर काढून सिंधी पिंपळगाव शिवारातील चित्तोडा नदीच्या पश्‍चिम तिरावर पुरल्याची कबुलीही संशयितांनी दिली आहे.

जालना - बदनापूर तालुक्‍यातील मांडवा येथे दारू पिऊन त्रास देण्यासह शेत वाटून मागत असल्याच्या कारणावरून चुलत्यासह चुलत भाऊ, नातेवाइकांनी जन्मदात्या आईसमोर मुलाचा खून केल्याची घटना मंगळवारी (ता. तीन) उघडकीस आली आहे. गणेश कोंडीआप्पा अंलकार असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे या खुनात मृताच्या आईचाही सहभाग असल्याचे प्राथमिक तपास उघडकीस आले आहे. याप्रकरणी ‘एडीएस’ने दोन जणांना अटक केली आहे. 

बदनापूर तालुक्‍यातील मांडवा येथील गणेश कोंडीआप्पा अलंकार यांचा त्याच्या आई समक्ष आठवडाभरापूर्वी खून झाल्याची माहिती एडीएसचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली. त्यानंतर एडीएसच्या पथकाने मांडवा येथून चुलता भागनआप्पा सटवाआप्पा अंलकार व सचिन सदाशिवआप्पा अलंकार या संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान गणेश अंलकार हा दारू पिऊन घरी त्रास देत होता; तसेच शेतीमध्ये हिस्सा मागत होता. त्यामुळे चुलता गणेश कोंडीअप्पा अलंकार, चुलत भाऊ सचिन सदाशिवआप्पा अंलकार, बाळू तुकाआप्पा अंलकार, नातेवाईक भट्टू धोंडू झिपरे यांनी गणेशला त्याची आई राधाबाई हिच्यासमक्ष ता. २७ ऑगस्ट रोजी मारहाण केली, गणेशचा डोक्‍यात दगड घालून खून केला. त्यानंतर गणेश अंलकार यांचे दोन वेळ वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह पुरल्याची कबुलीही ताब्यात घेतलेल्या संशयितांनी दिली आहे. याप्रकरणी या पाच जणांविरोधात चंदनझिरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिरसाट करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, कर्मचारी ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, सुभाष पवार, किरण चव्हाण, सचिन आर्य यांनी केली.

मृतदेह काढला बाहेर
संशयितांनी गणेश खून करून चित्तोडा नदी पात्रालगत पुरलेला मृतदेह पोलिसांनी तहसीलदार आर. एल. दळवी यांच्या उपस्थितीमध्ये बाहेर काढला. या मृतदेहांचा पंचनामा करून वैद्याकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder Crime