औरंगाबाद शहरात येणार फिरते वस्तुसंग्रहालय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाचा उपक्रम असलेले "फिरते वस्तुसंग्रहालय' राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागातर्फे 20 ते 24 ऑक्‍टोबर दरम्यान शहरात आणले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सोनेरी महल येथे जाऊन ही विशेष बस पाहता येईलच. शिवाय शहरातील विविध शाळांनाही ती भेटी देईल. या कालावधित सोनेरी महालातील प्रादेशिक वस्तुसंग्रहालयास भेट देणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य असेल. याचा लाभ घेण्याचे आवाहन पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अजित खंदारे आणि प्रादेशिक वस्तूसंग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक शं. धो. मुळे यांनी केले आहे. 

म्युझियम ऑन व्हील्स 
ज्या विद्यार्थ्यांना वस्तूसंग्रहालयापर्यंत पोचता येत नाही, त्यांच्यापर्यंत वस्तुसंग्रहालयच नेता यावे, या कल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाने वर्ष 2015 मध्ये "सिटी इंडिया'च्या मदतीने आणि शासनाच्या वस्तूसंग्रहालय संचालनालयाच्या सहयोगाने ही बस तयार केली. विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने इतिहास शिकवण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील प्रदर्शने भरवून ही बस मुंबईसह राज्यातील विविध शहरांत आणि खेड्यापाड्यांतही नेली जाते. बसमध्ये पुराणवस्तूंनी भरलेले शोकेस, संवादी डेमो किट्‌स, ऑडिओ-व्हिज्युअल उपकरणे, टचस्क्रीन्स, डिजिटल टॅब्लेट्‌स आणि मनोरंजक माहितीपट दाखवण्याची सोय आहे.

आपल्या शाळेतही बोलवा 
फिरत्या वस्तुसंग्रहालयाची बस 20 आणि 21 ऑक्‍टोबरला विद्यापीठ परिसरातील सोनेरी महाल येथे उभी राहील. बसमधील प्रदर्शनासोबतच विद्यार्थ्यांसाठी इतरही मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले जातील. मनोरंजक माहितीपट, चित्रपट, लघुपट दाखवले जातील. 21 ते 24 ऑक्‍टोबरदरम्यान, फिरते वस्तुसंग्रहालय आपल्या शाळेत नेण्यासाठी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून वेळ ठरवता येईल. 

शिक्षकांसाठी कार्यशाळा 
शहरातील शाळांच्या शिक्षकांसाठी यानिमित्त 20 ऑक्‍टोबरला विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सोनेरी महल येथे "वस्तुसंग्रहालय - इतिहास शिकविण्याचे एक समृद्ध माध्यम' या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेमुळे शिक्षकांना, इतिहास शिकवण्यासाठी वस्तूसंग्रहालयाचा "भूतकाळ जिवंत करणारे माध्यम' म्हणून कसा उपयोग करता येईल, हे सांगितले जाईल. सहभागी होण्यासाठी उत्सुक संस्था आणि शिक्षकांनी, education@csmvs.in यावर नोंदणी करावी किंवा 022-2284 4484/4419 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: A museum will come in Aurangabad city