माणूस जगणे महत्त्वाचे, कोरोनाग्रस्तांसाठी मुस्लिम बांधवांनी खुली केली मदरसा अन्‌ वसतिगृह

Latur Madarsa  News
Latur Madarsa News

लातूर  : जात, धर्म महत्त्वाचा नाही, माणूस जगणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण माणूस होऊन माणसाच्या मदतीला धावून जाणे आम्हाला जास्त महत्त्वाचे वाटत आहे. शेवटी माणुसकी हा आपला एकमेव धर्म आहे, अशी भावना व्यक्त करत शहरातील काही मुस्लिम बांधवांनी आपली मदरसा (शाळा) तर इतर काहींनी वसतिगृह कोरोनाबाधित रुग्णांसाठी खुले करून दिले आहे.
कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुढे काय होणार, याची कोणालाही कल्पना नाही. तरीसुद्धा सरकार, प्रशासन आपल्या पातळीवर वेगवेगळी पावले उचलताना दिसत आहे.

प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रुग्णालय उभारण्याची तयारीही केली जात आहे; पण तरीसुद्धा रुग्णांची संख्या वाढली तर कोठे-कोठे सोय करायची, हा सध्या मोठा प्रश्न आहे. याची जाणीव ठेवून शहरातील काही मुस्लिम बांधव सरकार आणि प्रशासनाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यानिमित्ताने जात, धर्म यापेक्षा माणुसकी महत्त्वाची, याचे दर्शन पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची मदत व्हावी हा विचार करून बांधकाम व्यावसायिक फकीर मिस्त्री आणि खैरात मिस्त्री या बांधवांनी शहरातील अंबाजोगाई रस्त्यावरील आपले वसतिगृह खुले केले. याबाबत ‘सकाळ’शी बोलताना फकीर मिस्त्री म्हणाले, अंबाजोगाई रस्त्यावर आमचे सहा फ्लॅटचे एक अपार्टमेंट आहे. त्याचे रूपांतर आम्ही वसतिगृहात केले आहे. सध्या महाविद्यालयाला सुट्या असल्याने मुले आपापल्या गावी गेली आहेत. त्यामुळे वसतिगृह रिकामे आहे.

इथे सर्व सुविधा आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली तर त्यांना या वसतिगृहात ठेवून त्यांच्यावर उपचार करता येईल. येथे ६५ रुग्ण राहू शकतात. याबाबची माहिती आम्ही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिली आहे. मौलाना इस्त्राईल यांची साई रस्त्यावरील गुरुकुलजवळ मदरसा आहे. त्यांनी ती कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मौलाना म्हणाले, आमच्याकडे १७ वर्गखोल्या आहेत. प्रत्येक खोलीत चार याप्रमाणे ६८ जणांची सोय येथे केली जाऊ शकते. मदरसा आहे म्हणून केवळ मुस्लिमांचीच सोय करायची, असे अजिबात नाही. हिंदू, ख्रिश्चन, शीख अशा कुठल्याही धर्मातील व्यक्तींची सोय येथे करता येईल. जात, धर्म महत्त्वाचे राहिलेले नाही. माणसाने माणसाच्या मदतीला धावून जाणे जास्त महत्त्वाचे आहे. येथे रुग्णांच्या राहण्याचीच नव्हे तर जेवणाचीही सोय करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. याबाबतची पूर्ण माहिती जी. श्रीकांत यांना आम्ही कळवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com