माझे पती निर्दोष; सीबीआयकडून फसवणूक - शीतल अंदुरे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - ""माझे पती सचिन अंदुरे निर्दोष आहेत. एटीएसने निर्दोष असल्याचे सांगून घरी आणून सोडले होते. त्यानंतर लगेचच सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. "दोन दिवसांत घरी पाठवितो. आम्ही पकडल्याचे कुणाला कळू देऊ नका; अन्यथा तुमच्या जिवाला धोका होऊ शकतो,' असे सांगून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी फसवले,'' असा आरोप सचिन अंदुरेची पत्नी शीतल यांनी केला आहे. 

औरंगाबाद - ""माझे पती सचिन अंदुरे निर्दोष आहेत. एटीएसने निर्दोष असल्याचे सांगून घरी आणून सोडले होते. त्यानंतर लगेचच सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. "दोन दिवसांत घरी पाठवितो. आम्ही पकडल्याचे कुणाला कळू देऊ नका; अन्यथा तुमच्या जिवाला धोका होऊ शकतो,' असे सांगून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी फसवले,'' असा आरोप सचिन अंदुरेची पत्नी शीतल यांनी केला आहे. 

"सकाळ'शी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सचिनला 14 ऑगस्टला दुपारी कपड्यांच्या दुकानातून चौकशीसाठी नेले. त्या वेळी सचिनचे भाऊ प्रवीणदेखील सोबत गेले होते. चौकशीनंतर त्यांना एटीएसने सोळा ऑगस्टला दुपारी परत औरंगाबादला आणून सोडले; परंतु नंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी काही क्षणांत त्यांना पकडून नेले. पोलिसांना वीस ऑगस्टपर्यंत कोणत्याही स्थितीत आरोपी पकडण्याचे टार्गेट देण्यात आले होते, त्यामुळेच माझ्या पतीला पकडण्यात आले, असा आरोप शीतल अंदुरे यांनी केला आहे. सचिनची शरद कळसकर याच्याशी मैत्री नाही, असेही त्यांनी सांगितले. 

कोण होता सचिन अंदुरे? 
- सचिनचे बालपण धावणी मोहल्ल्यात गेले असून, कपड्यांच्या दुकानात लेखापाल (अकाउंटंट) म्हणून काम करतो. याशिवाय लेखा परीक्षणाची (ऑडिट) इतर कामेही तो करायचा. 
- दोन वर्षांपूर्वी त्याचा शीतलसोबत प्रेमविवाह झाला. त्यांना यावर्षी 22 फेब्रुवारीला मुलगी झाली. पंधरा जूनला तिचे नामकरण झाले. 
- सचिन कुठेच जात नसे. शक्‍यतो अकोला येथे बहिणीकडेच जायचा, अशी माहिती शीतल अंदुरे यांनी दिली. 
- त्याचा भाऊ प्रवीण हर्सूल येथे राहत असून, शिवाजीनगर भागातील एका पेट्रोलपंपावर कामाला असल्याची बाब कुटुंबीयांनी सांगितली. 

मालकासह दुकानातील कामगारांना धक्का 
सचिन शांत स्वभावाचा मुलगा असून, तो निष्ठेने काम करीत होता. तो असे करू शकत नाही, असा विश्‍वास दुकानमालक दिलीपकुमार साबू यांनी व्यक्त केला. सचिनच्या अटकेचा धक्का बसल्याचे कामगारांनी सांगितले. 

सचिन निर्दोष आहे भाऊ प्रवीण अंदुरे याचा दावा 
पुणे - दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या त्याचा भाऊ प्रवीण अंदुरे याने सचिन निर्दोष आहे, असे प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले. 

मी 2006 पासून कुटुंबीयांपासून वेगळे राहत होतो व सचिन शिक्षणासाठी आई-वडिलांसोबत राहत होता, त्यामुळे पुढे तो काय करत होता, याबद्दल मला काहीही माहिती नाही. मात्र, तो निर्दोष आहे, त्याला "सीबीआय'ने फसवले आहे. तो देशभक्त असून निर्व्यसनी व प्रामाणिक आहे. त्याच्यावर औरंगाबादमध्येही कोणता गुन्हा दाखल नाही, असे प्रवीण म्हणाला. 

सुनावणी झाल्यानंतर अंदुरेच्या वकिलांनी प्रवीण याला त्याचा भाऊ सचिनची भेट घेऊ द्यावी, अशी विनंती न्यायाधीशांना केली. न्यायालयाने परवानगी दिल्यावर कोर्टरूमध्ये प्रवीण याने सचिनची 10 मिनिटे भेट घेतली. 

Web Title: My husband is innocent Cheating by the CBI says Sheetal Andure