
नाफेडने हमीभावाने हरभरा खरेदीची तयारी केली आहे. जालना येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्र येथे गुरुवारी (ता.१६) हरभरा खरेदीची सुरवात करण्यात आली आहे
जालना - तूर खरेदीपाठोपाठ आता नाफेडने चार हजार ८७५ रुपये हमीभावाने हरभरा खरेदीची तयारी केली आहे. जालना येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्र येथे गुरुवारी (ता.१६) हरभरा खरेदीची सुरवात करण्यात आली आहे. तर भोकरदन येथे यापूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी सुरू केली आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडचे तूर खरेदी केंद्र आहे. याच ठिकाणी गुरुवारी (ता.१६) हरभरा खरेदी केंद्राचे माजी राज्यमंत्री तथा बाजार समिती सभापती अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, बाजार समिती सचिव रजनीकांत इंगळे, पंडित भुतेकर, अंकुश परकाळ, सूर्यकांत कदम, सचिन गोल्डे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद
जिल्ह्यात नाफेडने सहा हरभरा ऑनलाइन नोंदणी केंद्र सुरू केले आहेत. या सहा नोंदणी केंद्रांवर ता.१५ एप्रिलपर्यंत तीन हजार ८९३ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक जालना येथील हरभरा नोंदणी केंद्रावर दोन हजार ६५९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे आता गुरुवारी (ता.१६) जालना येथील केंद्रात खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे.
भोकरदनमध्ये खरेदी
नाफेडच्या भोकरदन येथील हरभरा खरेदी केंद्रावर ता. १५ एप्रिलपर्यंत ८२५ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यामुळे येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून ता. १५ एप्रिलपर्यंत १९० शेतकऱ्यांकडून एक हजार ७९४.५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.