नागापूर प्रकल्पाने गाठला तळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

परळी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्‍यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पाने तळ गाठला आहे. दीड लाख लोकसंख्येच्या परळी शहरावर पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. परळीकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी पर्याय उभा करण्याकडे पालिकेत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनी पाठ फिरविल्याने नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे.

परळी वैजनाथ - परळी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्‍यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पाने तळ गाठला आहे. दीड लाख लोकसंख्येच्या परळी शहरावर पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. परळीकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी पर्याय उभा करण्याकडे पालिकेत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनी पाठ फिरविल्याने नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे.

दहा-बारा दिवस जाऊनही शहरातीला नळांना पाणी न आल्याने व पालिकेमार्फत टॅंकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्याने शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. खासगी टॅंकरवाले मनमानी करून नागरिकांची लूट करत आहेत. दिवसरात्र नागरिक पाण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

परळी शहरातील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या खडका (ता. सोनपेठ) येथील गोदावरी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होत आहे. परंतु, ते पाणी तहानलेल्या परळीकरांना पिण्यासाठी मिळावे म्हणून सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही प्रयत्न करताना दिसत नाहीत. शहरालगत असलेल्या चांदापूर, कन्हेरवाडी येथील लघू प्रकल्पातून परळीकरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीच ठोस भूमिका घेतली जात नाही. टॅंकरवाल्यांचे धंदे बसतील म्हणून कुणीही काहीही करायला तयार नसल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत. 

सुमारे १९ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता असलेला वाण मध्यम प्रकल्प प्रथमच यंदाच्या तीव्र दुष्काळात कोरडा पडला आहे. हा प्रकल्प एकदा भरला की परळीकरांच्या पिण्याच्या पाण्याची दोन वर्षे चिंता दूर होते. गतवर्षी पावसाळ्यात वाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस झाल्यामुळे हा प्रकल्प भरला नव्हता. या प्रकल्पात १५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. गेल्या सहा महिन्यांत या प्रकल्पातील पाण्याचा शेती, उद्योगासाठी वापर झाला. हा उपसा थांबविण्यासाठी परळी पालिकेने दुर्लक्ष केले. प्रकल्पातील पाणी काही प्रमाणात आरक्षित ठेवले असते तर परळीकरांवर पाणी टंचाईची वेळ आली नसती. या प्रकल्पाने तळ गाठल्याने गेल्या दोन महिन्यांपासून शहराला आठ-दहा दिवसांतून एक वेळ पाणी पुरवठा होत आहे. आता तर अनेक भागांत तोही बंद झाला आहे.

पालिकेमार्फत शहरास ३२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी त्यावर मर्यादा पडल्या आहेत. पाण्याची वाढती मागणी व नियोजनाचा अभाव यामुळे अनेक नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे अवघड झाले आहे.

खासगी टॅंकरवाले एक हजार लिटर पाण्यासाठी अडीचशे ते तीनशे रुपये घेत असून पैसे देऊनही खासगी टॅंकरवाल्यांकडून पाणी मिळत नसल्याने शहरात पाण्यासाठी मोठी ओरड सुरू झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हातपंप, बोअर कोरडे पडले आहेत. जुन्या गावातील बहुतेक आड, विहिरीही कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे भीषण संकट परळीकरांवर उभे राहिले असून या परिस्थितीत पालिकेचे पदाधिकारी कुठे आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व इतरांनी शहरातील पाणी प्रश्न जाणून घेण्यासाठी कुठेही भेट दिली नाही. विरोधकांनीही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे-खाडे यांनी तातडीने याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खडका येथील बंधाऱ्यातून परळीकरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, परंतु त्याचे काहीच झाले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagapur Project Water Shortage