नांदेडला पुन्हा ‘कोरोना’चा संशयीत रुग्ण 

File Photo
File Photo

नांदेड : ‘कोरोना’च्या व्हायरसने जगाला धडकी भरवली आहे. ‘चीन’मध्ये पसरलेला हा ‘कोरोना’ व्हायरस आता इतर देशाकडे कूच करताना दिसत आहे. काही दिवसापूर्वीच चीनहून हैदराबादमार्गे नांदेडात परतलेल्या एका विद्यार्थ्यांस ‘कोरोना’ संशयीत रुग्ण म्हणून त्यास एक आठवडाभर विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात डॉक्टरच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्या नंतर तीन दिवसापूर्वी हैद्राबादहून नांदेड शहरात दाखल झालेल्या एका व्यक्तीस ‘कोरोना’ संशयीत रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 

नांदेड जिल्ह्यास तेलंगणा, कर्नाटकच्या सीमा लागून आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांची नेहमी ये - जा असते. शिवाय सध्या तेलंगणा, आंध्र प्रदेशात काही रुग्ण कोरोनाचे संशयीत म्हणून आढळून आले आहेत. त्यामुळे तीन दिवसापासून विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या ‘त्या’ व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे. लवकरच सकारात्मक अहवाल येईल, अशी अपेक्षा रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. दिल्लीनंतर महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नाशिक शहरात देखील ‘कोरोना’ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

रोजच तेलंगणाच्या सीमावर्ती भागातून जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश 

तेंलगणातून नांदेड जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे. परंतू इतर राज्यातील ‘कोरोना’ संशयीत एकही रुग्ण जिल्ह्यात येऊ नये, या साठी जिल्हा स्तरावर बैठकावर बैठका घेतल्या जात असल्या तरी, प्रत्यक्षात कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या, याबद्दल फारशी माहिती उजेडात येत नाही. त्यामुळे तीन दिवसापूर्वी हैदराबादहून शहरात दाखल झालेल्या एका व्यक्तीस ‘कोरोना’ संशयीत म्हणून रुग्णालय प्रशासनाने त्यास निगराणीखाली ठेवले असले तरी, अजून किती लोक आहेत. जे रोजच तेलंगणाच्या सीमावर्ती भागातून जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करतात. त्याचे आरोग्य उत्तम आहे का? या बद्दल माहिती मिळत नाही.

केंद्रासह राज्य सरकारची झोप उडाली

चीनमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणले जात आहे. भारतात परतलेल्या सर्वच प्रवाशांची विमानतळावर कसून तपासणी करुन त्यांना घरी पाठवायचे की, रुग्णालयात डॉक्टरच्या देखरेखी खाली ठेवायचे याबद्दल निर्णय घेतला जात असला तरी, ‘चीन’हून मायदेशात परतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग आजाराची लक्षणे आढळून येत असल्याने केंद्रासह राज्य सरकारची झोप उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मंगळवारी (ता.तीन) ‘ट्विट’ करत ‘कोरोना’ आजारास घाबरु नका, आरोग्याची काळजी घ्या, हात स्वच्छ धुवा, असे आवाहन केले आहे.

लवकरच रक्तजल तपासणी अहवाल प्राप्त होईल
तीन दिवसापूर्वी तेलंगणा भागातून एक व्यक्ती शहरात दाखल झाली होती. त्यांना ‘कोरोना’ संशयीत रुग्ण म्हणून रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. लवकरच रक्तजल तपासणी अहवाल प्राप्त होईल.
- डॉ. एस. आर. वाकोडीकर, प्रभारी अधिष्ठाता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com