गोदावरी महामहोत्सवात होणार ज्वलंत विषयांवर विचारमंथन

प्रमोद चौधरी
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

नांदेड : गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने गोदावरी महामहोत्सव पंधरवाडा १८ जानेवारी ते एक फेब्रुवारी २०२० या काळात होत आहे. या काळामध्ये विविध विषयांवर विचारमंथन होणार असून, त्यात प्रामुख्याने गोदावरी व उपनद्या जल प्रदुषणमुक्ती, नांदेड रेल्वे झोनची स्थापना, नवीन रेल्वेमार्गासोबतच विद्युतीकरण, दुहेरीकरणसाठी आग्रही भूमिका असणार आहे.

नांदेड : गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने गोदावरी महामहोत्सव पंधरवाडा १८ जानेवारी ते एक फेब्रुवारी २०२० या काळात होत आहे. या काळामध्ये विविध विषयांवर विचारमंथन होणार असून, त्यात प्रामुख्याने गोदावरी व उपनद्या जल प्रदुषणमुक्ती, नांदेड रेल्वे झोनची स्थापना, नवीन रेल्वेमार्गासोबतच विद्युतीकरण, दुहेरीकरणसाठी आग्रही भूमिका असणार आहे.

गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी गोदावरी महामहोत्सव घेण्यात येतो. या महामहोत्सवाच्या माध्यमातून विविध विषयांवर विचारमंथन होऊन जिल्ह्यातील समस्या सुटाव्यात हा यामागील मुख्य हेतू आहे. त्यानुषंगाने यंदाही गोदावरी महामहोत्सव पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कारासह जिल्ह्याच्या विकासविषयक चर्चासत्र होणार असून,  १८ जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत हा महामहोत्सव होईल, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
 

दिंड्यांची गळाभेट आकर्षण

यावर्षी गोदावरी महामहोत्सव समिती, जिल्हा प्रशासन, ज्येष्ठ नागरिक संघटना, नामदेवराव दाताळकर सत्कार समिती, सहकारी बॅंक व पत संस्था, श्री छत्रपती शिवाजी ग्रामविकास मंडळ, शिशिर प्रकाशन, शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना, डॉक्टर्स संघटना, सामुहिक विवाह मेळावा आदी संघटनांच्या पुढाकारातून हा महामहोत्सवाचे आयोजन होत आहे. मानकरी दिंडियांची गळाभेट हा या महोत्सवातील आकर्षक सोहळा असतो.

दक्षिण गंगा गोदावरी

दक्षिण गंगा म्हणून गोदावरीचे पावित्र्य आजही कायम आहे. परंतु, गोदावरीचे पावित्र्य सद्यस्थितीत जोपासले जाताना दिसत नाही. या पंधरवाड्याच्या माध्यमातून गोदावरीच्या पावित्र्याची जोपासना व्हावी यासाठी गोदावरी महामहोत्सव समिती पुढाकार घेत आहे. २४ जानेवारी रोजी पौष अमावस्या असून, त्यानिमित्ताने दक्षिण गंगा गोदावरी जलसंस्कृती प्रति आदराचे कार्यक्रम २२, २३, २४, २५ जानेवारी रोजी होतील. हा महामहोत्सव यशस्वी करण्यासाठी नामदेवराव कदम, डॉ. हंसराज वैद्य, प्रा. डॉ. पुष्पा कोकीळ, डॉ. एस. बी. मोरे, रावसाहेब महाराज, प्रा. डॉ. एन. ई. अंभोरे, प्रा. डॉ. बाबुराव पावडे, प्रा. संजय शिंदे, प्रा. अशोक मोरे, अजय कदम, गुरुराव पाटील, प्रा. किसनराव शिंदे, दिलीप सिरसाट, गणपत पाचंगे, गिष्म देशमुख, अजय कदम, हेमंत कल्याणकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत. दरम्यान दिनदर्शिका आणि विकास पुस्तिकाचेही प्रकाशन याप्रसंगी होणार आहे.

पंधरवाड्यातील चर्चासत्रे

गोदावरी महामहोत्सव पंधरवाड्यात विविध विषयांवर विचारमंथन व्हावे, यासाठी चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये (१) गोदावरी व उपनद्या जलप्रदुषण मुक्ती, (२) नांदेड रेल्वे झोनची स्थापना, नवीन रेल्वे मार्गांसह विद्युतीकरण व दुहेरीकरण (०३) संविधान आर्टीकल ३७१ मधील गुजरात, महाराष्ट्र-तेलंगण-आंध्रप्रदेश-उत्तर कर्नाटक-गोवा राज्यांसाठी नॉर्थ ईस्ट प्रमाणे केंद्र व राज्यस्तरावर मंत्रालयाची स्थापना आणि विकास अनुशेष निर्मूलन. (०४) नदीजोड जलसाठे स्थीरीकरण ग्रिड, माती-जल-हवा जंगल-टेकड्या पर्यावरण संवर्धन (०५) भाषा बोली लिपी विकास विद्यापीठ महाविद्यालये शाळांमध्ये चर्चासत्रे (०६) एनएसएस व एनसीसी तज्ज्ञ कार्यकर्त्यांच्या संयोजनातून विद्यार्थ्यांसाठी निबंध वकतृत्व स्पर्धा (०७) निसर्ग-वन-कृषी-तीर्थक्षेत्र पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती (०८) ज्येष्ठ नागरिक पेन्शन, निराधार मानधन, पत्रकार मानधन अशा विविध विषयांवर मंथन व चिंतन होईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded The Godavari Maha Mahotsav will have a discussion on the burning issues