अवयदानासाठी नांदेडला 'ग्रीन कॉरिडॉर'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अवयवदानासाठीच्या सुविधा उपलब्ध करून, अवयव प्रत्यारोपणासाठी पाठविण्याची प्रक्रिया नांदेडसारख्या तुलनेने लहान शहरातही यशस्वी करून दाखविली आहे. 
 

नांदेड - अवयवदान आणि या अवयवांच्या वाहतुकीसाठी "ग्रीन कॉरिडॉर‘ म्हणजे जलदगती सुविधा उपलब्ध करून देण्यात नांदेडकर बुधवारी यशस्वी झाले. ब्रेन डेड झालेल्या सुधीर रावळकर या रुग्णाचे हृदय नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावरून मुंबईकडे रवाना करण्यात आले, तर यकृत पुण्याकडे रवाना करण्यात आले. 

नांदेडच्या सुधीर रावळकर यांच्या अवयवांमुळे पाच जणांचे आयुष्य सावरले जाणार आहे. अवयवाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधला. "ग्रीन कॉरिडॉर‘साठी पोलिस यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, विमानतळाशी निगडित व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणांना गतिमान केले. विष्णुपुरीतून विमानतळापर्यंत हेलिकॉप्टरनेही हृदय पाठविण्याची शक्‍यता पडताळून पाहण्यात आली. विष्णुपुरी ते विमानतळ हे अंतर कापण्यासाठी एरवी 45 मिनिटे तरी लागतात; मात्र आज हे अंतर विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या 13 मिनिटांत पार करण्यात आले. 
 

मुखेड तहसीलमधील रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी सुधीर रावळकर (वय 35) यांचा नरसी-मुखेड रस्त्यावर सोमवारी (ता. 17) रात्री अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना सुरवातीला नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी रावळकर यांचा मेंदू मृत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय कुटुंबाने मंगळवारी सायंकाळी घेतला. 
 

जिल्हा प्रशासन आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाने रावळकर यांच्या अवयदान समंतीपत्रानुसार रावळकर यांच्या अवयवांचे दान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याबाबत अवयदानाशी निगडित औरंगाबाद येथील विभागीय समितीशी संपर्क साधण्यात आला. वैद्यकीय चाचण्या आणि अन्य अनुषंगिक सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर बुधवारी सकाळी हृदय घेऊन जाण्यासाठी मुंबईतील फोर्टिंस हॉस्पिटलचे हृदय-प्रत्यारोपणतज्ज्ञ, तर यकृत घेऊन जाण्यासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलचे डॉक्‍टर, मूत्रपिंड घेऊन जाण्यासाठी औरंगाबादच्या कमलनयन बजाज रुग्णालयाचे डॉ. अजय ओसवाल नांदेडमध्ये दाखल झाले. दुपारी दोन वाजून अट्ठावीस मिनिटांनी हृदय घेऊन डॉ. मुळे आणि त्यांचे सहकारी विमानतळाकडे रवाना झाले. अवघ्या 13 मिनिटांत हा ताफा विमानतळावर पोचला आणि दोनच मिनिटांत हृदय घेऊन विमान मुंबईकडे झेपावले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात यकृत घेऊन पुण्याचे पथक विमानाने रवाना झाले, तर औरंगाबादचे पथक मूत्रपिंड घेऊन मोटारीने रवाना झाले. 

थॅंक्‍यू नांदेड आणि प्रशासनाचे अश्रू 
हृदय घेऊन डॉ. मुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या लिफ्टमधून वाहनाकडे जाताना तेथील उपस्थितांकडे पाहून "थॅंक्‍यू नांदेड, थॅंक्‍यू‘ असे म्हणाले. विष्णुपुरी ते विमानतळ हा एरव्ही 45 मिनिटांचा कालावधी लागणारा प्रवास विक्रमी 13 मिनिटांत पार पाडला. त्यानंतर हृदयासह मुंबईकडे रवाना होतानाही डॉ. मुळे यांनी कृतज्ज्ञतेपोटी हात हलवून निरोप घेतला. एकीकडे नांदेडसारख्या शहरात अवयवदानाचा प्रयोग यशस्वी झाला. हृदय, यकृत आणि मूत्रपिंड, डोळे यांसारखे अवयव दान करण्यात यश आले. दुसरीकडे नांदेड जिल्हा प्रशासनाशी निगडित एक उमदा सहकारी-मित्र गमावल्याची खिन्नता जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये होती. 

Web Title: nanded to have green corridor