esakal | नांदेड : बालविवाहाची वाढली भीती शिक्षकांना चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

Child Marriage

नांदेड : बालविवाहाची वाढली भीती शिक्षकांना चिंता

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये जवळपास बंदच होती. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींना घराचा उंबरठा ओलांडता आला नाही. दरम्यान, अनेक पालकांच्या हाताला देखील काम नव्हते. तेव्हा मुलीच्या लग्नासाठी पुढे पैसे आणायचे कुठुन? अशी परिस्थिती असल्याने काही पालकांनी मुलींना लग्नाच्या बेडीत अडकवल्याचे चित्र आहे. यंदा अकरावी प्रवेशाला मुलींच्या टक्क्यात घट झाल्याचे अनेक प्राध्यापक, शिक्षकांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुलींच्या बालविवाहाची भीती देखील शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत काही दिवसांपासून इयत्ता आठवी, नववी, दहावी सोबतच बारावीपर्यंतचे वर्ग सुरु केले आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही मुलींच्या शिक्षणाकडे फारसे गांभिर्याने बघितले जात नाही. मुलीचे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झाले की मुलीस आईला मदत करण्यासाठी म्हणून घरातील कामासह शेतीच्या कामाला जावे लागते. अन्यथा तिच्या लग्नाची घाई सुरु होते. त्यामुळे केरळ राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात मुलींची संख्या कमी व मुलींच्या शिक्षणांचे प्रमाण देखील कमी आहे.

हेही वाचा: जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत

नुकताच दहावी - बारावीचा निकाल लागल्यानंतर शाळा - महाविद्यालयात विद्यार्थ्यांची रेलचेल सुरु आहे. शहरातील एकमेव के. आर. एम. महिला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात अकरावी, बारावी आणि बीए, बी कॉम, होम सायन्स अशा अभ्यासक्रमासाठी पाचशेपेक्षा अधिक प्रवेश क्षमता आहे. असे असताना देखील पंधरा दिवस झाले तरी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या कमीच झाली आहे. शहरातील यशवंत, पीपल्स, सायन्स, एनएसबी आदी नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अजूनही कमीच आढळून आली आहे.

या संदर्भात पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव यांनी देखील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असली तरी वसतीगृह अद्याप सुरु झाली नाहीत. शिवाय दहावी बारावीनंतर काही पालकांनी मुलीचे लग्न उरकून टाकल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळेच यंदा मुलींच्या प्रवेशाचा टक्का घसरल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: काबूल विमानतळ बंद; देशाच्या सीमेवर अफगाण नागरिकांची झुंबड

सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. स्त्री शिकली पाहिजे म्हणून त्यांनी जो त्याग केला त्या सावित्रीबाई फुले यांचे आजही स्वप्न पूर्णपणे साकार झाले, असे म्हणता येणार नाही. राज्यात आजही मुलींच्या शिक्षणाला फारसे महत्व दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून महाराष्ट्र मुलींच्या शिक्षणाच्या व लिंग गुणोत्तराच्या बाबतीत केरळ राज्यापेक्षा मागे आहे.

- प्रा. व्यंकटी पावडे, के. आर. एम. महिला महाविद्यालय, नांदेड.

loading image
go to top