esakal | जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत; 'BJP'ला धास्ती चालू सत्तेची
sakal

बोलून बातमी शोधा

जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत

आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कशी टक्कर देतात, काय व्यूहरचना करतात, याकडे लक्ष असेल

जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : ‘समोरचा टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम करायचा’, अशी राजकीय स्टाईल असलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथील मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या पुढील निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. गट निहाय संभाव्य उमेदवार आणि गट राष्ट्रवादीत (NCP) खेचले जात आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये ही निवडणूक होणार आहे.

भाजपच (BJP) नव्हे तर काँग्रेसचे (Congress) एकेक गट आणि सरदार ताब्यात घेत ते पुढे निघाले आहेत. काहींनी प्रवेश घेतला आहे तर काहींनी तयारी केली आहे. भाजप मात्र सध्याची जिल्हा परिषदेतील उरलेली सत्ता जयंतरावांमुळे अडचणीत येईल की काय, अशा भितीने अध्यक्ष बदल करण्याचे धाडस दाखवायला तयार नाही. त्यामुळे भाजपमधील अध्यक्ष बदलाची मागणी करणारा गट नाराज आहे. तोही आता राष्ट्रवादीच्या गळाला लागेल की काय, अशी स्थिती आहे.

हेही वाचा: अन् 14 दिवसात तिच्या चेहऱ्यावर आली ‘मुस्कान’

जिल्हा परिषदेत सध्या भाजपची सत्ता आहे. इतिहासात पहिल्यांदा भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. भाजपला येथे पूर्ण बहुमत नाही. त्यांना शिवसेनेचे पाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक, रयत आघाडीचे २ अशा अन्य घटकांची साथ आहे. सध्या प्राजक्ता कोरे अध्यक्ष आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा आणि नवे पदाधिकारी नेमावेत, अशी मागणी भाजपच्या एका गटाने जोरकसपणे कली आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी बहुमताचे गणित जमत असेल तर बदल करा, असे सांगितले. ते गणित काही जमायला तयार नाही. ते चुकले आणि अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी-काँग्रेसने डाव टाकला तर महापौर निवडीसारखी होईल, अशी भिती भाजपला आहे.

वास्तविक, चारच महिन्यांची सत्ता बाकी आहे. अशावेळी भाजपने का घाबरावे, अशीही चर्चा आहे. ते सध्याची सत्ता वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जयंत पाटील यांनी पुढच्या सत्तेच्या गणिताला हात घातला आहे. या स्थितीत भाजपसमोरील आव्हाने कठीण होत निघाली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांभोवती जयंतरावांनी फिल्डिंग लावली आहे. त्यात जतचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अशा प्रमुखांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपसाठी पुढील जिल्हा परिषद निवडणुकीत आव्हान उभे करताना कसरत करावी लागू शकते. त्याला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कशी टक्कर देतात, काय व्यूहरचना करतात, याकडे लक्ष असेल.

हेही वाचा: पूरग्रस्तांसाठी चालतच राहणार; जलसमाधी परीक्रमेत शेट्टींचा इशारा

loading image
go to top