Lok Sabha Election 2024 : नांदेडमध्ये तिन्ही प्रमुख उमेदवारांनी बदललेत पक्ष... चिखलीकर, चव्हाण अन् भोसीकरांचाही समावेश

Nanded Lok Sabha Election 2024 : नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तीनही मुख्य पक्षाच्या उमेदवारांनी आत्तापर्यंत वेगवेगळे पक्ष बदलले आहेत.
 Nanded Lok Sabha Election 2024 BJP pratap patil chikhalikar VS Congress vasantrao chavhan Vs VBA  Avinash Bhosikar Political History
Nanded Lok Sabha Election 2024 BJP pratap patil chikhalikar VS Congress vasantrao chavhan Vs VBA Avinash Bhosikar Political History

नांदेड : नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तीनही मुख्य पक्षाच्या उमेदवारांनी आत्तापर्यंत वेगवेगळे पक्ष बदलले आहेत. त्यातील भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांनी तर चार पक्ष तर वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी दोन आणि कॉँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी एक पक्ष आत्तापर्यंत बदलला आहे.

अनेक पक्षातून आलेल्या चिखलीकरांना उमेदवारी

प्रताप पाटील चिखलीकर यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षापासून सुरू झाली. सरपंच ते जिल्हा परिषदेचे सभापती होईपर्यंत ते कॉँग्रेस पक्षात होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले. २००४ मध्ये लोहा कंधारमधून विधानसभेची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंड करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आणि आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना बिनशर्त पाठिंबा दिला. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी लोकभारती पक्षातर्फे निवडणुक लढवली मात्र पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मात्र, पूर्वी राष्ट्रवादीचा आमदार असल्यामुळे त्यांना २०१४ च्या निवडणुकीत विधानसभेची उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून उद्धव ठाकरेंकडून शिवबंधन बांधून घेतले. त्यानंतर २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते विजयी झाले. शिवसेनेत असताना त्यांनी भाजपच्या नेत्यांशी घरोबा करत शिवसेनेशी बेईमानी केली. आमदार शिवसेनेचा मात्र काम भाजपचे सुरू ठेवले. २०१७ च्या नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वात लढण्यात आल्या.

परंतु सत्ता मिळविण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून नांदेड लोकसभेची उमेदवारी मिळवली आणि त्यात त्यांना यश मिळाले आणि खासदार झाले. आता पुन्हा एकदा ते भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चार पक्ष बदलून आता भाजपमध्ये आलो असून मी भाजप सोडणार नाही, असा शब्दही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. या निवडणुकीत ते सध्या निवडून येणार, मताधिक्य किती मिळणार याच अर्विभावात असल्याचे चित्र आहे.

 Nanded Lok Sabha Election 2024 BJP pratap patil chikhalikar VS Congress vasantrao chavhan Vs VBA  Avinash Bhosikar Political History
Nanded Lok Sabha Election : भूमिपुत्र की जावई? रंगली चर्चा, लागल्या पैजा! कोणाला मिळणार मतदारांची पसंती?

वसंतराव राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस

नायगावचे वाड्यावरचे चव्हाण पाटील म्हणून ओळख असलेल्या वसंतराव चव्हाण यांचे वडील बळवंतराव चव्हाण हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते. १९८० मध्ये बळवंतराव चव्हाण बिलोलीचे आमदार झाले होते. त्यानंतर त्यांचे पुत्र वसंतराव चव्हाण हे नायगावचे २४ वर्षे सरपंच तसेच दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य होते. त्यानंतर शरद पवार यांनी वसंतराव चव्हाण यांना २००२ मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषद सदस्य केले.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे वसंतराव चव्हाण यांनी नायगावमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडून आले. त्यानंतर त्यांनी कॉँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला आणि नंतर कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत ते कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून नायगावमधून आमदार झाले. २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला. नायगाव बाजार समितीचे सभापती आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे कॉँग्रेसमधून भाजपात गेले. मात्र, वसंतराव चव्हाण त्यांच्यासोबत गेले नाहीत कॉँग्रेसमध्येच राहून त्यांनी अशोकरावांच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे त्यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

 Nanded Lok Sabha Election 2024 BJP pratap patil chikhalikar VS Congress vasantrao chavhan Vs VBA  Avinash Bhosikar Political History
Loksabha election 2024 : लाखांच्या मताधिक्याचं गुपित उलगडणार! माढ्यात रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात लढत?

जनसुराज्य ते वंचित भोसीकरांचा प्रवास

लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील पानभोसी (ता. कंधार) येथील ॲड. अविनाश भोसीकर यांचा राजकीय प्रवास सुरू होण्याआधी ते विद्यार्थी चळवळीत होते. शिक्षण आणि सामाजिक प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलने केली. त्यानंतर त्यांनी विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. २००९ मध्ये त्यांनी नांदेड उत्तर विधानसभा निवडणुक जनसुराज्य पक्षातर्फे लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अल्प मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. नंतर त्यांनी राजकारणापासून काही काळ अलिप्त होते. महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा शहरात उभा रहावा तसेच लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी आंदोलन केले.

त्यावेळी पोलिसांच्या रोषाला देखील त्यांना सामोरे जावे लागले होते. गेल्या काही महिन्यापासून सकल मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाल्यानंतर त्यांनी ओबीसी चळवळीत उडी घेतली. या दरम्यान, त्यांनी नरसी येथे वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी एल्गार मेळावा घेतला. तसेच ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासोबत काम करण्यास सुरूवात केली. त्यामुळे ओबीसी बहुजन पक्षातर्फे शेंडगे यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु त्यांनी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांना आंबेडकर यांनी वंचिततर्फे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितचा मतदार भोसीकर यांच्या पाठीमागे कितपत राहतो यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

मतदार ‘नोटा’च्या विचारात!

गेल्या दोन तीन वर्षात महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे जवळपास सगळ्याच पक्षांमध्ये उलाथापालथ झाली. एकेकाळी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून असणारे नेते आता मांडीला मांडी लाऊन बसले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कोणता झेंडा घेऊन हाती? असा प्रश्न पडला आहे. तसेच मतदार राजा देखील या राजकारणाला कंटाळला असून तो देखील संताप व्यक्त करत आहे. त्यातील काही मतदारांनी तर या सगळ्यावर जालीम उपाय म्हणून ‘नोटा’ला मतदान करण्याची चर्चा सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com